
सामना ऑनलाईन,मुंबई
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापौर, पालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबईभरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर तब्बल 322 पंप बसवण्यात आले असून संरक्षक लोखंडी जाळ्यांमुळे 2765 मॅनहोल सुरक्षित झाल्याची माहिती यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली. शिवाय नालेसफाई 90 टक्क्यांवर झाली असून अंतिम टप्प्यात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते.
भायखळा येथील महापौर बंगल्यात महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या बैठकीत पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रशासनाने पावसाळ्याच्या तयारीसाठी केलेल्या उपाययोजनांचे संगणकीय सादरीकरण केले. मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना घडू नयेत यासाठी गेल्या वर्षी 1742 तर यावर्षी 31 मे 2019 पर्यंत 1023 अशा एकूण मॅनहोलवर 2765 संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भरपावसात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी सर्व वॉर्डमध्ये आवश्यकतेनुसार कोल्डमिक्सचे वाटप करण्यात आले आहे. डेंग्यू-मलेरियाला आळा घालण्यासाठी धुम्रफवारणी, डास उत्पत्ती करणाऱ्या ठिकाणे नष्ट करणे अशी कामे वेगाने सुरू आहेत. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी यंत्रणा सुसज्ज ठेवल्याची माहिती यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड, उपायुक्त सुनील धामणे, विनोद चिठोरे आदी उपस्थित होते.
वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवा – आदित्य ठाकरे
पावसाळ्यात 225 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. यातील 35 ठिकाणी संवेदनशील आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित ठिकाणी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था सक्षम ठेवा अशा सूचना यावेळी शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केल्या. यासाठी संबंधित विभागांशी समन्वय ठेवावा असेही ते यावेळी म्हणाले. सोशल मीडियातून आणि प्रसारमाध्यमातून येणाऱ्या तक्रारींची दखल प्राधान्याने आणि तातडीने घ्यावी आणि या तक्रारी वेगाने सोडवण्यासाठी कार्यशाळा कार्यान्वित करावी असेही ते यावेळी म्हणाले.
पावसाळा दिलासादायक ठरणार – महापौर
अतिवृष्टी झाल्यास मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध प्राधिकरणांशी समन्वय साधून काम केले आहे. त्यामुळे येणारा पावसाळा मुंबईकरांना दिलासादायक ठरेल, असा विश्वास महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दुर्घटना टळावी यासाठी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करावी अशा सुचना आदित्य ठाकरे यांनी केल्या. तर मुंबईच्या पूर्व-पश्चिम दिशांना जोडणाऱ्या पुलांबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
मुंबईसाठी हवे एकच प्राधिकरण उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
मुंबईत पालिकेसह ‘एमएमआरडीए’, ‘म्हाडा’, एमएसआरडीसी, बीपीटी, रेल्वे अशी अनेक प्राधिकरणे-संस्था आहेत. मात्र अतिवृष्टी किंवा कुठलीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर फक्त पालिकेवर टीका केली जाते. दोषारोप ठेवण्यात येतात. त्यामुळे मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केले. अतिवृष्टीच्या वेळी अनेक वेळा नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिकेचे दवाखाने, शाळा, पालिकेची विभाग कार्यालये अशा ठिकाणांचा नागरिकांना उपयोग करता यावा यासाठी संबंधित ठिकाणी दिशादर्शक फलक लावा अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला केल्या.
पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एक-दोन तर काही ठिकाणी चार पंप लावण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एमएमआरडीए, मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबून नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनांना पावसाळ्यासाठी यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या असून समन्वयाने काम सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.





























































