
राजेश देशमाने
भारताच्या १५ व्या विद्यमान राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी (२५ फेब्रुवारी) श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनानिमित्त शेगाव दौर्यावर आलेल्या राष्ट्रपतींनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत श्रींच्या चरणी नतमस्तक होत देशाच्या प्रगतीसाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.
राष्ट्रपतींच्या आगमनाने संपूर्ण श्री मंदिर परिसर भक्तिभाव, उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा यांनी भारून गेला होता. मंदिर प्रशासन व विश्वस्त मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नीलकंठदादा पाटील, हरिहरदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी राष्ट्रपतींचे स्वागत करून मंदिराच्या कार्याची माहिती दिली.
मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करून राष्ट्रपतींनी श्रींच्या समाधीवर पुष्प अर्पण केले व काही क्षण ध्यानस्थ राहून प्रार्थना केली. या प्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींनी मंदिर परिसरातील स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भक्तांसाठी उपलब्ध सुविधा पाहून समाधान व्यक्त केले. श्री मंदिर संस्थानामार्फत राबविण्यात येणार्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली.
वारकरी परंपरेतून स्वागताची भक्तिमय अनुभूती राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी वारकरी भजन मंडळाने सादर केलेल्या
‘आजी सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनुष्ठ’ या अभंगाने वातावरण अधिकच पवित्र झाले. तुतारीच्या निनादात आणि भजनांच्या सुरावटीत झालेल्या स्वागताने वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक परंपरा अनुभवायला मिळाली. ब्राह्मणवृंदांच्या उपस्थितीत विजयाताई निळकंठदादा पाटील व त्यांच्या सुना समिक्षा रामकृष्ण पाटील व शिवाणी हरिहर पाटील यांनी औक्षण करून राष्ट्रपतींचे पारंपरिक सन्मानाने स्वागत करण्यात आले.




























































