
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती ठरविण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपविरोधातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची 15 जून रोजी दिल्लीत यासाठी बैठक बोलावली आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 22 राजकीय नेत्यांना पत्र पाठवून या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी केली आहे.
राज्यसभेनंतर आता 17 जुलै रोजी होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी एनडीएने त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा अद्याप केलेली नाही, परंतु निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक जुळवाजुळव करण्याच्या तयारीला लागलेत. तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधातील सर्वांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींसह 22 नेत्यांना निमंत्रण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामीळनाडूचे एम. के. स्टालिन, झारखंडचे हेमंत सोरेन, पंजाबचे भगवंत मान यांच्यासह देशातील विविध पक्षांच्या 22 प्रमुख नेत्यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र पाठवून नवी दिल्लीत 15 जून रोजी कॉन्स्टिटय़ूशन क्लब येथे होणाऱया बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.




























































