
जालना जिल्ह्यामध्ये सर्व नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील सर्व हॉटेल, ढाबा, खानावळ, चहाचे हॉटेल, बार रेस्टॉरंट, भेळ गाडे, पाणीपुरी गाडे, नाश्ता सेंटर, रसवंतीगृह, ज्युस सेंटर, चायनिज सेंटर, पावभाजी सेंटर आदी ग्राहकांसाठी पुर्णत: बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत उपाययोजना करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विविध विभागांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी म्हणाले की, जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जालना शहरामध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरच्या वापराबरोबरच सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केले आहेत.
जिल्ह्यात गेल्या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. परंतु प्रशासनाकडून कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांकडून पालन करण्यात आले नाही. तसेच कोरोनाच्या बाबतीत बेफिकीरी बाळगल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात टेस्टिंगची संख्या वाढविण्याबरोबरच हाय व लोरिस्क सहवासितांचा अचूक शोध घेऊन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
हॉटेल, चहाच्या टपऱ्या, पानशॉप यासारख्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते. तसेच या ठिकाणी नागरिक तोंडावरचा मास्क काढत असल्याने गर्दी होणाऱ्या आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या मोठ्या प्रमाणात अँटिजेंन तपासण्या करण्यात येत असून अनेक कामगार या तापसणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने हे कामगार कोरोनाच्या भीतीने निघून जाऊ नयेत तसेच औद्योगिक क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी या कामगारांसाठी औद्योगिक वसाहतीमधेच कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देशही संबंधिताना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंधात्मक आदेश
जालना जिल्ह्यामध्ये सर्व नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील सर्व हॉटेल, ढाबा, खानावळ, चहाचे हॉटेल, बार रेस्टॉरंट, भेळ गाडे, पाणीपुरी गाडे, नाश्ता सेंटर, रसवंतीगृह, ज्युस सेंटर, चायनिज सेंटर, पावभाजी सेंटर इत्यादी ग्राहकांसाठी पुर्णत: बंद राहतील. परंतु केवळ पार्सल सुविधेसाठी हॉटेल सुरु राहतील. त्याठिकाणी सर्वांनी कोविड-19 बाबतचे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सक्तीने पाळावीत व मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सोशल डिस्टसींग इत्यादीचे पालन करणे बंधनकारक राहील. सर्व संबंधीत यंत्रणा, नगर परिषद, नगर पंचायत, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांनी नियमांचे पालन होत असल्याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. संबंधीत आस्थापनांचे चालक हे कोविड -19 बाबतच्या या नियमांचे पालन करीत नसल्याने निर्दशनास आल्यास त्यांच्यावर तात्काळ बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.
लॉजींग सुरु राहील तथापि तेथील व्यक्तींची जेवणाची सोय लॉजच्या डायनिंगमध्ये न करता संबंधितांच्या रुममध्ये देण्याची सुविधा संबंधीत लॉज मालकाने करावी. कोविड-19 बाबतचे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सक्तीने पाळावीत. मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सोशल डिस्टंन्सिंग, आदींचे पालन करणे बंधनकार राहील. जालना जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील सर्व पान टपऱ्या पुर्णत: बंद राहतील. हे निर्बंध सोमवारी मध्यरात्रीपासुन ते 31 मार्च रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.



























































