पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी ‘मुद्रा लोन’ची राज्यात वाताहत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हातगाडीवर व्यवसाय करणाऱया भाजी विक्रेत्यापासून ते मोठय़ा व्यापारी, उद्योजकांना विनातारण कर्ज उपलब्ध करणाऱया केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुद्रा लोन’ योजनेची महाराष्ट्रात वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील तब्बल 33 लाख 26 हजार 514 ग्राहकांचे कर्ज बुडीत (एनपीए) निघाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. या ग्राहकांनी तब्बल चार हजार 619 कोटींचे कर्ज थकविले असून, बँकांच्या कर्जवसुली पथकांना ते दाद देत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन ते बुडविणाऱया राज्यातील 36 जिह्यात परभणी जिल्हा राज्यात अव्वल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

केंद्र सरकारने 8 एप्रिल, 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना जाहीर केली. छोटे व्यावसायिक, उद्योजकांना त्यांचा व्यवसायवाढीसाठी अथवा व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या तीन कॅटेगिरीमध्ये विनातारण कर्ज सुविधा या योजनेमध्ये मिळते. यामध्ये शिशू मुद्रा कर्ज योजनेंतर्गत 50 हजारांपर्यंत कर्ज देण्यात येते, तर किशोर मुद्रा योजनेंतर्गत 50 हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते, तर तरुण मुद्रा लोन योजनेंतर्गत पाच ते दहा लाखांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या योजनेचा जास्तीत जास्त व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, यासाठी केंद्र सरकारने एसटी महामंडळाच्या बसस्थानक, बसवर जाहिराती केल्या होत्या. विनातारण कर्ज सुविधा, तसेच शिशू आणि किशोर योजनेतील कर्जांना कोणतीही प्रोसेसिंग फी नसल्याने मागील पहिली पाच वर्षे कर्ज घेण्यासाठी बँकांमध्ये  व्यावसायिक गर्दी करीत होते. एवढेच नव्हे, तर बँकांना मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असल्याने बँकांनीही मुद्रा योजनेंतर्गत बिनधास्त कर्ज वाटप केले. मात्र, आता हे कर्ज वाटप करणे बँकांच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे. 33 लाख 26 हजार 514 ग्राहकांचे कर्ज एनपीएमध्ये गेले आहेत. या ग्राहकांनी तब्बल 4 हजार 619 कोटी 2 लाखांचे कर्ज थकविल्याची माहिती मिळाली आहे.

कर्ज विनातारण असल्याने बुडीतचा प्रकार अधिक

 पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर या कर्जाची नियमित परतफेड करणाऱया मोठय़ा कर्जदारांना 10 टक्के अनुदान मिळते. असे असूनही तरुण योजनेंतर्गत तब्बल 70 हजार 36 व्यावसायिकांनी मुद्रा योजनेतील कर्जाची परतफेड केली नाही. या कर्जदारांकडे 1,314 कोटी 45 लाख रुपये विविध बँकांची थकबाकी आहे. बँक तज्ञांच्या मते विनातारण कर्ज देण्याची शासनाची योजना असल्याने बँकांना कर्जवसुली करताना अडचणी येतात. परिणामी, बुडीत कर्ज वाढते.