जय जवान, जय किसान, जय कामगार! हेच महाराष्ट्राचे धोरण, उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या खेडय़ापाडय़ात व दुर्गम भागात उत्तम आरोग्य सुविधा, स्वावलंबी शेतकरी व कामगारांचे हित जोपासण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील. त्यामुळे ‘जय जवान, जय किसान, जय कामगार’ हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केली

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सोहळय़ाला सौ. रश्मी ठाकरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविरुद्धचा लढा, प्रयोगशाळा, शेतकरी कर्जमुक्ती, शिक्षण व उद्योग क्षेत्र व गुंतवणुकीचा आढावा घेतला.

किसान हरितक्रांती करतात, तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगारसुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळतात, असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले.

कोविड योद्धय़ांचे कौतुक

ध्वजारोहण सोहळय़ानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  सौ. रश्मी ठाकरे यांनी पोलीस,

डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक व कोरोनावर मात केलेल्या नागरिकांचीही भेट घेतली व त्यांचे कौतुक केले.

रोजगाराच्या संधी

अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात सध्या सुमारे 50 ते 60 हजार उद्योग सुरू झाले आहेत. उद्योग क्षेत्रात 12 देशांमधील गुंतवणूकदारांसोबत सुमारे 16 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. कोरोनाच्या संकटातही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  

आरोग्य सेवेला प्राधान्य

आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेडय़ापाडय़ांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी कर्जमुक्ती

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे 29 कोटी 50 लाख शेतकऱयांना 18 हजार 980 कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

महाराष्ट्र लढवय्या

कोरोनाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, कोरोना चाचण्यांसाठी राज्यात 150 टेस्टिंग लॅब सुरू केल्या आहेत. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यावर आपण देशात प्रथम तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या स्थापन केल्या. महाराष्ट्र हा लढवय्यांचा प्रदेश आहे. कितीही संकटे आली तरी आपण डगमगलो नाही.