पोलिसांची नजर चुकवून फरार झालेला कैदी अवघ्या 4 तासात पुन्हा तुरुंगात, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

कळंबा मध्यवर्ती जेलमधून कामकाजासाठी बाहेर आल्यानंतर जेल पोलिसांची नजर चुकवून दूपारी पळुन गेलेल्या आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या विठठल तुकाराम आटुगडे (मुळ रा.मेनी,आटुगडे वाडी,ता.शिराळा जि. सांगली) या कैद्याला अवघ्या चार तासांतच स्था.गु. अन्वेषन शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.

यासंदर्भात स्था.गु.अन्वेषन शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज जिल्हा मध्यवर्ती कारागृह कळंबा येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी विठठल आटुगडे याला कळंबा कारागृहातून कामकाजासाठी बाहेर काढण्यात आले होते. आय.टी.आय. संभाजीनगर परिसरात येथे काम करताना जेल पोलिसांची नजर चुकवून दुपारी 12.45 च्या सुमारास तो पळून गेल्याने खळबळ उडाली होती. खून व बलात्कार अशा गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला हा कैदी पळून गेल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचा आदेश
मिळताच स्था.गु.अन्वेषण शाखेच्या पथकाने, त्या परिसरातील झाडाझुडपातही शोध मोहीम राबवली असता कैद्याच्या वेशापैकी शर्ट काढलेला आणि अंगात बनियन व कैद्याच्या वेशातील पॅन्ट असलेला हा कैदी आढळला. त्याचा पाठलाग करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलिसांवर दगड फेकुन मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याला पो.हे.कॉ वैभव दड्डीकर व पो.ना.जितेंद्र भोसले यांनी ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि.तानाजी सावंत, स.पो.नि.सत्यराज घुले, संतोष पवार, अजित वाडेकर, राजु आडुळकर, संदिप कुंभार, रणजित कांबळे, सागर कांडगावे, ओंकार परब, नितीन चोथे, कुमार पोतदार, प्रदिप पवार आदीं या कारवाईत सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या