येरवड्यातून जामिनावर सुटणाऱ्या कैद्याचे स्वागत भोवले, 11 जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खून प्रकरणातील कैद्याची येरवडा कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी कारागृहासमोर एकत्रित आलेल्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे संचारबंदीत एकत्र येऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

लाला सिद्धू ठुसे, गणेश दत्तात्रय चोंधे, गणेश पांडुरंग काळे, सोपान नवनाथ मडके, शिरीष अनिल कारले, दादा बबन गव्हाणे, योगेश लक्ष्मण गव्हाणे, नितीन भिकोबा सोडनवर, संतोष हरिभाउ गव्हाणे, अंकुश विठ्ठल मल्लाव, संदीप बापू जगदाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन रणदिवे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात 2015 मध्ये झालेल्या खूनप्रकरणात विष्णू यशवंत जाधव आरोपी आहे. दोन दिवसांपुर्वी त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका होणार होती. त्यापार्श्वभूमीवर जाधवला घेऊन जाण्यासाठी येरवडा कारागृहासमोरील रस्त्यावर 11 जणांनी गर्दी केली होती. संचारबंदीत सोशल डिस्टन्स न पाळता त्यांनी व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणली होती. शिवाय कोरोनाचा संसर्ग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे अधिक तपास करीत आहेत.