
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थानचा धडाकेबाज युवा फलंदाज पृथ्वी शॉ घोटय़ाच्या दुखापतीतून सावरला असून सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेण्टी-20 क्रिकेट स्पर्धेद्वारे तो पुनरागमन करणार आहे. मुंबईच्या 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) नुकतीच करण्यात आली. त्यात शॉच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.
इंदूर येथे 21 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत रंगणाऱया या स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर महिन्यात झालेल्या कसोटी मालिकेपूर्वीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीला दुखापत झाली होती. त्यानंतर प्रथमच तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी होणार आहे.
मुश्ताक अली टी -20साठी मुंबईचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, आकाश पारकर, एकनाथ केरकर, ध्रुमिल मटकर, शम्स मुलानी, शुभम रांजणे, तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस.






























































