पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव हिंदुस्थानी कसोटी संघात, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी झाली निवड

मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांची हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीकडून सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील चार ऑगस्टपासून सुरू होणाऱया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दोघांची निवड करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान व शुभमन गील या खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे तिघांनाही हिंदुस्थानच्या इंग्लंड दौऱयामधून माघार घ्यावी लागली. या तीन खेळाडूंऐवजी बीसीसीआयकडून पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव या खेळाडूंना इंग्लंड दौऱयात संधी देण्यात आली आहे. पृथ्वी शॉने स्थानिक तसेच आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. तसेच सूर्यकुमार यादवने मागील काही आयपीएल मोसमांत आपली धमक दाखवली होती. त्यामुळे दोन मुंबईच्या पठ्ठय़ांना टीम इंडियाचे तिकीट बुक करता आले आहे.

हिंदुस्थानचा चमू – रोहीत शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धीमान साहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

रिषभ पंत फिट

यष्टीरक्षक रिषभ पंत याच्या दोन चाचण्या कोरोना निगेटिव्ह आल्या आहेत. बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून त्याला सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, यष्टीरक्षक रिद्धीमान साहा व सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांचा लंडनमधील विलगीकरणाचा कालावधी संपला असून हे तिघे टीम इंडियाशी जोडले गेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या