‘एपस्टीन’च्या मेलमध्ये मोदींचा उल्लेख; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचेही नाव, पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा

जेफ्री एपस्टीनच्या एका ई-मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आहे, असा खळबळजनक दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत केला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचेही नाव या फाईल्समध्ये असल्याचे चव्हाण म्हणाले. ‘मोदींचा एपस्टीनशी नेमका संबंध काय आहे याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मागील काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण हे जेफ्री एपस्टीन प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाच्या फाईल्स खुल्या झाल्यानंतर हिंदुस्थानात राजकीय उलथापालथ होईल, असा दावा सर्वप्रथम त्यांनीच केला होता. फाईल्स खुल्या झाल्यानंतर त्यांनी आज कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एपस्टीन फाईल्समध्ये असलेल्या हिंदुस्थानी व्यक्तींची नावे सांगितली. ही नावे कोणत्या संदर्भात आली हेही त्यांनी सांगितले.

‘मोदी ऑन बोर्ड’चा अर्थ काय?

एपस्टीन फाईल्समध्ये हजारो ई-मेल्स आहेत. त्यातील एका ई-मेलचा संदर्भ देत चव्हाण यांनी यात मोदींचे नाव असल्याचे सांगितले. ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅरन यांनी हिंदुस्थानच्या पंतप्रधानांची भेट घालून द्या, अशी विनंती एपस्टीनला केली होती. त्यावर, मी प्रयत्न करतो असे एपस्टीनने सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी एपस्टीनने ‘मोदी ऑन बोर्ड’ म्हणजेच मोदी तयार आहेत, असा ई-मेल बॅरन यांना पाठवला. एपस्टीन हा बडय़ा लोकांना मोदींची अपॉइंटमेंट मिळवून देत होता हे यातून स्पष्ट होते. मग मोदींचे आणि एपस्टीनचे संबंध नेमके काय होते,’ असा प्रश्न चव्हाण यांनी केला.

नाव आले म्हणजे गुन्हा केला असे नाही, पण…

‘एपस्टीनला त्याच्या गुह्यासाठी 2008-09 ला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्या फाईल्समध्ये मोदींच्या मेलचा जो संदर्भ आला आहे तो 2014 सालचा आहे. एपस्टीन गुन्हेगार आहे हे सर्वांना माहीत होते. तो विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, तो देहव्यापार करतो हे माहीत असताना मोदींचा त्याच्याशी संबंध कसा आला? हरदीप पुरी हे त्यावेळी अमेरिकेत राजदूत होते. त्यांचे नावही यात आहे. पाच-सहा वेळा भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची यात काही भूमिका होती का, हेही शोधावे लागेल. एखाद्याचे नाव आले म्हणजे त्याने गुन्हा केला असे होत नाही. प्रश्न इतकाच आहे कीð या सगळय़ांचे संबंध नेमके कसे आले, असे चव्हाण म्हणाले.

सरकारचे मौन चिंताजनक

‘देशातील विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेस किंवा ‘इंडिया’ आघाडी या प्रकरणावर काय भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होईल, मात्र हिंदुस्थान सरकारकडून खुलासा होत नाही हे चिंतेची गोष्ट आहे. सोशल मीडिया व अनेक हिंदी ‘यूटय़ूब’ चॅनेल्सवर उघडपणे काही नावे घेतली जात आहेत. त्यावर एकही स्पष्टीकरण येत नाही. आमचा संबंध नाही असे कोणी बोललेले मला आढळलेले नाही,’ असे चव्हाण म्हणाले.

एपस्टीन इस्रायलचा हेर

‘एपस्टीन हा इस्रायलसाठी हेरगिरी करत होता. बडय़ा नेत्यांना गुंतवून त्यांना ब्लॅकमेल करायचे हे त्याचे काम होते. आपल्या नेत्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल केले गेले होते का हेही तपासावे लागेल,’ असे चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

< एपस्टीन फाईल्समध्ये सुमारे 30 वर्षांचा डेटा आहे. 300 जीबी डेटा आहे. हजारो ई-मेल्स, फोटो आणि व्हिडीओ आहेत. <dन फाईल्स खुल्या करण्याची मागणी करणारे जे खासदार आहेत, त्यात हिंदुस्थानी वंशाचे ध्रुव खन्ना हेही आहेत. < बाल लैंगिक शोषण झाल्याचे पुरावे समोर आल्यास आणि गुन्हा सिद्ध झाल्यास अमेरिकेत कडक शिक्षा होते. तसेच अशा गुन्हेगाराने जगात कुठेही गुन्हा केला असेल तर हिंदुस्थानातही शिक्षा होते. < आरोपी नकार देतील हे स्पष्टच आहे. मॉर्फ केलं आहे वगैरे म्हणतील, मात्र जनतेच्या न्यायालयात याचा विचार होईल. अशा व्यक्तींकडे सरकारची सूत्रे सोपवावी का, याचा विचार त्यांना तिथे नेमणाऱ्यांना करावे लागेल. < एपस्टीन फाईल अर्धवट खुल्या केल्या गेल्या आहेत. सर्व काही समोर यायला काही आठवडे लागतील. अमेरिकेच्या अध्यक्षांचं नाव असल्यामुळे ते काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतील, असे तेथील खासदारांना वाटते. त्यामुळे तिथे मोठा संघर्ष उद्भवेल.