शिवस्मारकाची उंची कमी करू नये, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

मुंबईच्या समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची कमी करून कसली काटसकर करत आहात, असा थेट सवाल राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. शिवस्मारकात बसवल्या जाणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे कारणच काय, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी करत पैसे नसतील तर तसे सांगा, महाराष्ट्रातील जनता पै-पै गोळा करून तुम्हाला देईल, असेही चव्हाण यांनी सुनावले. शासकीय विश्रामगृहात गुरूवारी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुंबईतील शिवस्मारकासाठी समुद्रातील जागेची निवड मुख्यमंत्री असताना मीच केली होती. शिवस्मारक उभारण्यासाठीच्या बहुतांशी मंजूऱ्या मीच घेतल्या होत्या. आराखडा निश्चित केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एकदा सोडून दोनदा भूमिपूजन केले. तरिही कामाला सुरूवात झाली नाही. मूळच्या आराखड्यात दोन टापा उंच केलेला घोडा होता. मात्र ठेकेदार कंपनीला खर्चात काटकसर करण्यास राज्यसरकारने सांगितले. त्यानंतर त्या कंपनीने चारा टापा जमिनीवर किंवा एक टाप वर केलेला घोडा अथवा घोड्याशिवाय केवळ पुतळा असे तीन पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत. त्यामधील एखादा पर्याय मान्य करून तलवारीची उंची वाढवायची असे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारवर दबाव आहे का? तसे नसेल तर शिवस्मारकातील पुतळ्याची उंची कमी करण्याचा कारण काय? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.