खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातवा वेतन आयोगाबरोबरच शाळांची एनओसी व मान्यता मुदतवाढ, 100 टक्के सानुग्रह अनुदान यांसह खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच सुटणार आहेत. पालिका शिक्षण सहआयुक्त आशुतोष सलील यांनी शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेला दिले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करून ते लवकर सुटावेत यासाठी शिवसेना उपविभागप्रमुख व जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे प्रमुख सल्लागार जितेंद्र जानावळे यांनी आशुतोष सलील यांची भेट घेतली. यावेळी जय महाराष्ट्र संघटनेच्या वतीने संस्थापक/अध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष सुनिल सुर्वे, सरचिटणीस संदीप परब व सभासद रामदास हंजनकर उपस्थित होते.

शिक्षक व कर्मचारी यांना सेवानिवृत्ती वेतन, सहाय्यक शिक्षकांचा तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरणे, 23 शिक्षण सेवकांचे वेतन हे वेतनपत्रकात समाविष्ट करणे, व एरिअस लवकर मिळणे तसेच पेन्शन परिपत्रक 667 मध्ये बदल अंतर्भूत करणे आदी प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील. याप्रकरणी शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सलिल यांनी सांगितले.