
लोकलमधून सर्व महिलांना नॉन पिकअवरमध्ये प्रवासाची मुभा दिल्यानंतर आता राज्य सरकारच्या मागणीवरून रेल्वेने खाजगी सुरक्षा रक्षकांनाही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. या खाजगी सुरक्षा रक्षकांना त्यांचा युनिफॉर्म आणि ओळखपत्र पाहून सुरूवातीला लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. नंतर त्यांना प्रवासासाठी राज्य सरकारकडून ‘क्यूआर कोड’ घ्यावा लागणार असल्याचेही मध्य आणि पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मुंबई उपनगरीय लोकलमध्ये बुधवार 21 ऑक्टोबरपासून सर्व महिलांना स.11 ते दु.3 आणि पुन्हा सायं.7 ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असताना आता खाजगी सिक्युरिटी गार्ड्सना लोकलमधून उद्यापासून परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारकडून क्युआर कोड घ्यावा लागणार
खाजगी सिक्युरिटी गार्ड्सचा युनिफॉर्म आणि त्यांचे ओळखपत्र पाहून सुरूवातीला प्रवास करता येणार आहे. त्यानंतर त्यांना राज्य सरकारकडून ‘क्यूआर’ कोड घ्यावा लागणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत एक एक सेवा सुरू करीत लोकलचा प्रवासही टप्प्या टप्प्याने अनेक घटकांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेची प्रवासी संख्या 40 हजारांनी वाढली
महिलांना प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर मध्य रेल्वेची प्रवासी संख्या काल 35 हजारांनी वाढली असून आज ती 40 हजारापर्यंत वाढली आहे. मध्य रेल्वेवर काल सुमारे 2 लाख 20 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.
22 मार्च रोजी रेल्वे बंद झाल्यानंतर 15 जूनपासून लोकलचा प्रवास सुरू झाला असला तरी तो अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांपुरता मर्यादित होता. अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी मध्य रेल्वेवर 706 तर पश्चिम रेल्वेवर 704 फेऱया चालविण्यात येत आहेत.


























































