>> प्रिया भोसले
‘संपूरणसिंह कालरा’ नावाच्या व्यक्तीला किती लोक ओळखतील शंकाच आहे, पण ‘गुलजार’ नाव घेतलं तर नुसती ओळख नाही, तर संपूर्ण हिंदुस्थान त्यांच्या प्रेमात असलेला दिसेल. संपूरणसिंह कालरा ऊर्फ गुलजार…दुःखाला भरजरी शब्दांची किनार देणारा, प्रेम व्यक्त करताना अवकाश, निसर्गही अपुरा पडेल अशा शब्दांची उधळण करणारा, प्रत्येक दशक गाजवणारा लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संवाद लेखक आणि शायर !
गुलजार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या दिना गावचा. फाळणीनंतर ते भारतात आले. सुरुवातीला मोटार गॅरेजमध्ये काम करत असताना मोकळ्या वेळात ते शायरीही करत. साहित्यात विशेष रुची असणाऱया गुलजारजींवर रवींद्रनाथ टागोर यांच्या लिखाणाचा इतका पगडा होता की, टागोरांचं मूळ भाषेतलं साहित्य वाचण्यासाठी ते बंगाली भाषा शिकले. याच भाषेमुळे पुढे PWA (Progressive writers association) मध्ये बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि सलील चौधरी यांच्यासारख्या बंगाली लोकांसोबत मैत्री झाली. बिमल रॉय यांनी त्यांना ‘बंदिनी’मध्ये गाणं लिहिण्याची पहिली संधी दिली. प्रसिद्ध होण्यासाठी लिहिण्यापेक्षा लोकांच्या मनापर्यंत पोचण्यासाठी लिहावं, अशा विचारांवर दृढ असणाऱया गुलजारसाब यांनी ‘गुलजार’ नावाने पहिलं गाणं लिहिलं,
‘मोरा गोरा अंग लईले
मोहे शाम रंग दईदे
प्रेमात प्रेमिकेचं फार फार तर ‘तुमको हमारी उमर लग जाये’ असं ठरावीक ओळीच्या साच्यात भावना व्यक्त करण्याची परंपरा असताना ‘मोरा गोरा अंग लई ले’ म्हणणारी बंदिनी प्रेमात चार पावले पुढेच वाटली. तसंही गुलजारच्या शब्दांनी प्रेमभावना व्यक्त करताना मोजमापाची मुलाहिजा कधीच बाळगली नाही. मग ते ‘देखना मेरे सर से, आसमाँ उड रहा है, देखना आसमां के सिरे खुल गये है जमीं से’ असली भन्नाट कल्पनाशक्ती असो किंवा कधी ‘कहने को साथ अपने एक दुनिया चलती है, पर चुपके इस दिल में तनहाई पलती है’ म्हणत एकटेपणाचा अभिमान वाटायला लावणारी गाणी असोत, गुलजारची गाणी तुम्हाला वरवरची प्रतिक्रिया देऊ देत नाही. ते शब्द तुमच्या मनापर्यंत पोचून चिंब भिजवतात.
‘हमने देखी है इन आंखो कि मेहकती खुशबू’पासून ‘कजरारे’, आणि ‘मेरा कुछ सामान’पासून ते ‘बिडी जलयले’पर्यंतचा प्रवास, ती शब्दांवरची पकड… सारं सारं थक्क करणारं आहे. फक्त तरुणांसाठी नाही, तर ‘लकडी कि काठी’ ते ‘चड्डी पेहन के फूल खिला है’ शब्दांतून त्यांनी नटखट शैशव जपलं, तर कधी वयाला ठेहराव देणारी ‘इजाजत’, ‘घर’, ‘मासूम’,‘आंधी’, ‘लेकिन’ची गाणीही दिली.
मूळचा शायराना अंदाज असल्यामुळे गुलजार यांना गाण्यातून उलगडणारा सिनेमा प्रिय आहे. म्हणून त्यांच्या बऱयाच चित्रपटांत आयुष्याचा काव्यमय प्रवास दिसेल. अगदी ‘आंधी’सारखा राजकीय विषयावरचा चित्रपट गुलजारजींच्या याच वैशिष्टय़ांमुळे रुक्ष वाटला नाही. विषय कोणताही असू दे, त्यातलं सौंदर्य शोधावं ते गुलजारसाब यांनीच!
फाळणीच्या वेदना, ते क्रौर्य अगदी जवळून बघूनही आयुष्यावर, त्यातल्या खुबसुरतीवर श्रद्धा अबाधित ठेवणाऱया या अवलियाने ‘देता किती घेशील दो कराने’ म्हणत मुक्तहस्ते आपल्याला आपलं आयुष्य खुशनुमा करणारी गाणी, चित्रपट दिले. ‘रावीपार’, ‘त्रिवेणी’, ‘रात पश्मीने की‘, ‘पुखराज’, ‘धूप आने दो’ ही आणि अशी अनेक शब्दांना अर्थ देणारी पुस्तके दिली. ‘राष्ट्रीय’, ‘ग्रामी’, ‘पद्म’, ‘जय हो’साठी मिळालेला ऑस्कर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱया गुलजार यांनी अनेक पुरस्कारांना गौरवांकित केले.
आताच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, शैलेंद्र आणि बिमल रॉयनी प्रोत्साहन दिलं नसतं तर ते सिनेमाकडे वळले नसते. साहित्य आणि शायरी यातच खुश असते. आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल असं काही ऐकलं की, परमेश्वराचे आभार मानावेसे वाटतात. कारण जर गुलजार सिनेक्षेत्रात वळले नसते तर आवडती गाणी, चित्रपट यांचं अस्तित्वच नसतं. त्या सुखाबाबतीत अनभिज्ञ असतो. त्या अज्ञानातल्या सुखाला तशी किंमतही नसती. अशा विचारांना मग त्यांनी लिहिलेल्या ओळीच समर्पक वाटतात…
‘तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं.’