
हंगेरी येथे आयोजित जागतिक कुस्ती स्पर्धेत हिंदुस्थानची शान उंचावणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू प्रिया मलिक हिने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे.
हरयाणाच्या जिंद इथली रहिवासी असलेल्या प्रिया मलिक हिने हिंदुस्थानी कुस्तीमध्ये इतिहास घडवला आहे. हंगेरीतल्या बुडापेस्ट इथे सुरू असलेल्या World Cadet Wrestling Championship मध्ये ती हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करत होती. तिने 73 किलो वजनी गटात बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 अशी धोबीपछाड देत या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे.
प्रिया मलिक हिचे पिता जयभगवान गिडानी हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. प्रियाच्या यशामागे तिचे प्रशिक्षक अंशु मलिक यांचा मोलाचा वाटा आहे. प्रियाने यापूर्वी 2020मध्ये नॅशनल स्कूल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. गेल्या वर्षी पाटणा येथे राष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेतही तिने सुवर्ण पदक पटकावलं होतं. आता ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करायला मिळावं अशी तिची इच्छा आहे.





























































