
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी देसी गर्ल ‘प्रियांका चोप्रा’ अमेरिकेत छान रमली आहे. यामुळे ती हल्ली हिंदुस्थानात फारशी दिसत नाही. पण यामागचं खरं कारण नुकतचं समोर आलं आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेता व गायक नीक जोन्सच्या प्रेमात बुडाली आहे. पार्टीज मध्येही तिच्यासोबत आता नीक दिसू लागला आहे. नीक प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी जरी लहान असला तरी त्याच्या फॅन्सचा आकडा प्रियांकांच्या चाहत्यांपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. साहजिकच त्यामुळे हॉलिवूडमध्ये या नवीन लव्ह बर्डसची जोरदार चर्चा आहे.
काही दिवसांपू्र्वी अमेरिकेतील डॉजर्स बेसबॉल स्टेडियम मध्ये प्रियांका नीकबरोबर आली होती. या दोघांची जोडी बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काहीजणांनी मोबाईलमध्ये त्यांचे फोटोही कैद केले व व्हिडिओही काढला. प्रियांका व नीक एकत्र दिसल्याची ही काही पहिली वेळ नाही. हे दोघेजण अनेकवेळा एकत्र दिसले आहेत. २०१७ मध्ये तर या दोघांनी रेड कार्पेटवर एकत्र एन्ट्रीही केली होती. याबद्दल प्रियांकाला विचारण्यात आलं होतं. पण तेव्हा तिनं हसून यावर बोलणं टाळलं होतं.



























































