गाझा प्रस्तावावर हिंदुस्थानची अनुपस्थिती लज्जास्पद! प्रियांका गांधी यांचा सरकारवर जोरदार हल्ला

मागील मोठय़ा कालावधीपासून इस्रायलचे गाझा पट्टीत हल्ले सुरू आहेत. दरम्यान, गाझामध्ये युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सादर केलेल्या ठरावावरील मतदानात हिंदुस्थान अनुपस्थित होता. यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले. हिंदुस्थानची अनुपस्थिती लज्जास्पद आहे. गाझामधील 60,000 लोक आधीच मारले गेले आहेत. तेथील लोक उपासमारीने मरत असताना आपण भूमिका घेण्यास नकार देत आहोत, असे त्यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून म्हटले.

हिंदुस्थानने नेहमीच पॅलेस्टाइनला पाठिंबा दिला आहे, मात्र हा गौरवशाली वारसा आता मोडकळीस आला आहे. गाझामध्ये उपासमारीने दररोज लोक मरत आहेत आणि आंतरराष्ट्रीय मदतदेखील थांबवण्यात आली आहे. हिंदुस्थानचे सरकार गाझाच्या मुद्दय़ावर केवळ मौन बाळगत नाही तर इस्रायली सरकारने इराणवर केलेल्या हल्ल्याचा आनंद साजरा करत आहे. एक राष्ट्र म्हणून आपण आपल्या संविधानाची तत्त्वे आणि स्वातंत्र्याची मूल्ये कशी सोडून देऊ शकतो? सध्या जगात भेदभाव वाढत आहे, आपण मानवतेसाठी आवाज उठवला पाहिजे. सत्य आणि अहिंसेसाठी निर्भयपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

इस्रायलच्या ताज्या हल्ल्यात गाझातील 16 ठार

इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष पेटलेला असताना इस्रायलने गाझा पट्टीत शनिवारी केलेल्या ताज्या हल्ल्यात किमान 16 पॅलेस्टिनी ठार झाले. हमास गटाचा नायनाट करण्यासाठी इस्रायलचे हल्ले कायम आहेत. गेल्या महिन्यापासून जवळजवळ दररोज इस्रायलने हल्ले केले. पॅलेस्टिनी नागरिकांच्या माहितीनुसार, इस्रायली सैन्याने जमावावर गोळीबार केला आहे. इस्रायली सैन्याने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.