
>>प्रा. अनिल कवठेकर
हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्याला देशातील आणि परदेशातील चांगली लोकेशन्स, चांगले नायक, नायिका, विनोदाचे बादशाह आणि बरंच काही दिले. त्याचबरोबर निरुपा रॉय नावाच्या अभिनेत्रीला आईच्या भूमिकेत वारंवार पाहण्याची संधीही दिली. आईची भूमिका कोण करत आहे यावरून तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा इतक्या उंचीवर आईची भूमिका घेऊन जाणारी आणि त्या भूमिकेला उंची देणारी अभिनेत्री म्हणजे निरुपा रॉय! साहित्यात आईवर खूप लिहिले गेले आहे. ‘श्यामची आई‘ आणि ‘मदर इंडिया’सारखे चित्रपटही आले. पण त्या प्रमाणात बापावर फार लिहिले गेले नाही. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने पडद्यावर साकारलेल्या प्रेरणादायी फादर्सचा घेतलेला हा आढावा…
बापाची मध्यवर्ती भूमिका असलेला Eिकवा बाप या व्यक्तिरेखेभोवती फिरणाऱया पटकथांचं लेखन न झाल्यामुळे हिंदी चित्रपटातला बाप मागे पडला आहे. तरीही वाटय़ाला आलेली बापाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे करणारे अनेक अभिनेते आहेत. 1968साली ज्यावेळी एकत्र कुटुंबपद्धतीला तडा जायला सुरुवात झाली होती आणि दिखाऊ संपत्तीच्या मागे लागण्याचा हव्यास निर्माण झाला त्या काळात ‘तीन बहुरानिया’ आला होता. यात तीन मुलांच्या बापाची भूमिका पृथ्वीराज कपूर यांनी केली होता. घर जोडणे, घराला शिस्त लावणे आणि विवाहित मुलांकडून चूक झाली म्हणून त्यांना बेंचवर उभे राहण्याची शिक्षा देणारा असा हा बाप होता. कदाचित आज पटणार नाही पण त्यामागची त्याची भूमिका जर समजून घेतली तर बापाचा हेतू लक्षात येतो. सगळय़ा भावभावनांचा सुंदर गोफ पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वाने भारुन टाकला होता.
‘गोलमाल’मध्ये उत्पल दत्त यांनी साकारलेला मुलीचा बाप हा चांगलाच लक्षात राहतो. आपल्या मुलीला सुशील आणि निर्व्यसनी मुलगा मिळावा अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. हीच इच्छा ठेवून उत्पल दत्त ज्या पद्धतीने नायक अमोल पालेकरशी आपल्या मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये असलेली प्रामाणिक बापाची पण विनोदाचा स्पर्श असलेली बापाची भूमिका कायम लक्षात राहील अशी होती.
ज्या चित्रपटाने ‘अँग्री यंग मॅन’ नावाचा एक जबरदस्त अभिनेत्याचा जन्म झाला त्या ‘जंजीर’मध्ये अमिताभ बच्चन आणि प्राण यांनी पडदा व्यापूनही बापाच्या छोटय़ाशा भूमिकेतला ओम प्रकाश यांचा अभिनय म्हणजे उत्तम अभिनयाची पावतीच आहे. शरीराने थकलेला, लाचार बाप. बदला घेऊ न शकणारा. त्याची तीन मुलं विषारी दारू पिऊन मेल्यामुळे विषारी दारू बनवणाऱयांना शिक्षा झाली पाहिजे असं सांगणारा बाप, दारूची बाटली घेऊन वेडय़ासारखा भटकणारा आणि त्यातून गोळा झालेली माहिती नायक विजयला पुरवणारा ओमप्रकाश यांचा बाप वेगळेपण सिद्ध करणारा होता.
‘शोले’मधला ए. के. हंगल यांचा अंध बाप ईमाम, आपल्या मुलाने शहरात जाऊन नोकरी करावी अशी अपेक्षा करणारा आणि मुलगा अहमदला शहरात जाऊन नोकरी कर असं बसंतीला सांगायला लावणारा बाप! नंतर गब्बर सिंग त्या मुलाला ठार करून त्याचे पार्थिव गावात पाठवतो. त्यावेळी हा बाप लोकांना सांगतो की, बेटा मैने खोया है, फिर भी चाहूंगा की दोनो इस गाव मे रहे. आज पुछूंगा खुदासे मुझे दोöचार बेटे और क्यू नही दिये गाव पर शहीद होने के लिए… स्वातंत्र्याची किंमत ही बलिदानातूनच मिळते आणि ते बलिदान द्यायला कुणीतरी तयार व्हायला हवे. आपल्या गावाशी असलेले इमान आणि गावाच्या स्वातंत्र्यासाठी एक बाप म्हणून जे इमाम बोलून जातो ते ‘शोले’तल्या इतर संवादाबरोबर लक्षात राहतो.
‘शराबी’मध्ये वडिलांची भूमिका प्राण यांना केली होती. संपत्तीच्या मागे धावणारा बाप आणि वडिलांचे प्रेम मिळावे, त्यांनी गप्पा माराव्यात. हसावं, खेळावं अशा अत्यंत सामान्य भावभावनांमध्ये गुंतलेला मुलगा अमिताभ अशी बापलेकाच्या संघर्षाची ही कहाणी होती. बाप म्हणून प्राण यात आपल्या मुलाच्या भावना समजून घेत नव्हता. कारण त्याचं विश्व केवळ पैसा होता. अमिताभ बच्चन त्याला म्हणतो की तू मिडास राजा आहेस. तुझ्या मुलाला जर स्पर्श केला तर तो सोन्याचा होईल आणि म्हणून तू मला स्पर्श करत नाहीस. अमिताभला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कथेत अमिताभचा बाप साकारणे साधी गोष्ट नव्हती. पण प्राणसारख्या जबरदस्त नायकाने अमिताभचा बाप तोडीस तोड साकार केला. त्यामुळे ‘शराबी’मधल्या संवादाबरोबर प्राणचा बापही लक्षात राहतो. बाप कसा नसावा हे सांगणारा तो बाप होता.
जेव्हा दोन महानायक बाप आणि मुलगा या भूमिकेतून समोरासमोर येतात तेव्हा त्या दोघांमध्ये एक वैचारिक संघर्ष ठरलेला असतो. दोघांचे जीवनाचे तत्त्वज्ञान वेगळे असणाऱया मुलाला जे हवे ते बापाला माहीत नसते आणि बापाला जे हवे ते मुलाला देता येत नाही. ट्रजेडी किंग दिलीप कुमार आणि महानायक अमिताभ बच्चन या दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्यास सिनेरसिक उत्सुक होते आणि ‘शक्ती’मध्ये दोघे बाप आणि मुलाच्या भूमिकेत आले. दिलीप कुमार पोलीस इन्स्पेक्टर आणि मुलगा गुन्हेगार. त्यांच्या नात्यापेक्षा ते दोघे आपल्या भूमिकेवर किती मनापासून प्रेम करतात हे पाहणे जास्त एन्जॉयेबल होते.
‘अर्धसत्य’मध्ये विलक्षण सनकी बाप दिसला जो आपल्या मुलाला आणि बायकोला किंमत देत नाही. 80 च्या दशकात पोलीस विभागात काम करणाऱया सनकी माणसाची भूमिका अमरीश पुरीने जिवंतपणे वठवली होती. पुढे अमरीश पुरी ‘फुल और काटे’मध्ये गुन्हेगार नागेश्वरच्या रूपामध्ये आला होता. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधला बाप पाश्चात्त्य देशात राहून आपल्या देशाची संस्कृती मनापासून जपणारा एक सच्चा हिंदुस्तानी, आपल्या मुलीने कसे जगावे याचे नियम ठरवणारा. अमरीश पुरीची भूमिका चांगली असूनही तो मुलीच्या दृष्टीने खलनायक ठरतो आणि हाच खलनायक चित्रपटाचा प्राण ठरतो. चित्रपटाला उंची देत त्यात भव्यता आणण्याचा काम करतो. ‘गदर’मधला अमरीश पुरीने साकारलेला बाप खलनायक होतो. फाळणीच्या पार्श्वभूमी लाभलेल्या कथेतला संघर्ष हा बापाच्या अहंकारातून निर्माण झालेला असतो. नंतरच्या अनेक चित्रपटांमध्ये कथा अमरीश पुरी भोवती फिरत राहील इतका अमरीश पुरीचा बाप म्हणून दरारा निर्माण झाला होता. पण तो नकारात्मक भूमिकेतला बाप होता. बापाच्या व्यक्तिमत्त्वांचा मागोवा घेताना ‘दृश्यम’ व ‘दंगल’ या दोन चित्रपटांचा उल्लेख महत्वाचा आहे. ‘दृश्यम’मधला बाप हा अत्यंत कमी शिकलेला आहे. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या हातून अजाणतेपणी झालेला गुन्हा लपवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करतो. विचारक्षमतेच्याही पलीकडे जाऊन कृती करतो. त्याचे आपल्या कुटुंबावर असणाऱया असीम प्रेमासाठी त्यांनी रचलेला चक्रव्यूह व भविष्यात काय काय घडू शकेल याचा केलेला विचार हे सगळे अकल्पनीय आहे. त्याच्या घरावर संकटाचे ढग कायम वावरत असताना अनेकदा पत्नी बेसावध असते पण हा बाप प्रत्येक क्षणी सावध असतो. कोणत्याही प्रकारची चूक आपल्या मुलीला आणि पत्नीला महागात पडू शकते याची जाणीव पदोपदी ठेवून आपल्या पद्धतीने काही रचना करत असतो. कुटुंबाला वाचवण्यासाठी एक बाप किती प्रयत्न करू शकतो या त्याच्या कर्तुत्वाभोवती हा चित्रपट फिरत राहतो. बापाची महती सांगणारे असे चित्रपट फारच दुर्मिळ होय.
‘दंगल’ची कथा हरयाणातल्या फोगाट यांची सत्यकथा आहे. कुस्तीमध्ये नाव केलेल्या बापाची ही कथा आहे आणि मुलगा झाला तर त्याला आखाडय़ात उतरवायचे, कुस्तीमध्ये देशाला गोल्ड मेडल मिळवून द्यायचे हे त्याचे स्वप्न आहे. पण तिन्ही वेळी त्याला मुलीच होतात आणि तो त्याच्या स्वप्नापासून दूर जातो. पण जेव्हा त्याच्या दोन मुली दोन मुलांना दणकून मारतात, तेव्हा त्याला त्याचे स्वप्न पुन्हा दिसू लागते. गीता आणि बबीता या दोघींना घेऊन तो पुन्हा कुस्तीमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याची स्वप्ने पाहू लागतो. तो म्हणतो गोल्ड तो गोल्ड है, छोरा मारे की छोरी, म्हारी छोरी क्या छोरो से कम है क्या… हा त्याचा संवाद त्याचा स्वतवरचा आणि त्याच्या मुलीवरचा आत्मविश्वास दाखवतो. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आणि आपले स्वप्न आपल्या मुलीमध्ये हळुवारपणे उतरवण्याची त्याने साधलेली किमया अप्रतिम आहे. यश मिळवण्यासाठी एका बापाने केलेले प्रचंड प्रयत्न. बौद्धिक आणि शारीरिकरित्या मजबूत करण्यासाठी केलेले प्रयोग. हरयाणातील गावातील लोकांच्या आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन केलेला विचार. एक झपाटलेला बाप, प्रेम करणारा बाप आपल्या मुलींवर विश्वास असणारा बाप, जिंकण्याचे वेड लावणारा बाप, लोकांकडून होणाऱया अपमानाला यशामध्ये परिवर्तित करणारा बाप आणि हा बाप पहिल्या टप्प्यात जरी मुलींना जेलर वाटला तरी कालांतराने आपल्या बापाचे स्वप्न हेच आपले स्वप्न म्हणून त्या दोन्ही मुली उतरतात आणि कुठेही कमी पडत नाही. आजच्या जगामध्ये बाप होणे सोपे आहे, प्रत्येक मुलाच्या मनातला हिरो हा बापच असतो हे बापाने समजून घेतले की बाप कधीही म्हातारा होत नाही. अशी प्रेरणा देणारे बाप वास्तवातसुद्धा असतात. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सर्व प्रेरणादायी वडिलांना मानाचा मुजरा!
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)





























































