प्रो कबड्डींच्या पकडापकडीला आजपासून प्रारंभ

कबड्डीच्या चढाई-पकडींना जागतिक स्तरावर नेणाऱ्या प्रो कबड्डीच्या दहाव्या पर्वाची पकडापकडी शनिवारपासून अहमदाबादच्या इकेए अरिना स्टेडियममध्ये सुरू होत आहे. गुजरात जायंट्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील लढतीने लीगचे उद्घाटन केले जाणार आहे. कबड्डीतील तगडे 12 संघ पुढील 12 आठवडे जेतेपदासाठी एकमेकांशी भिडतील.

आज अहमदाबादमध्ये अक्षर नदीवरील एका क्रूझवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रो कबड्डीच्या दहाव्या पर्वाचा उद्घाटन सोहळा पार पडला. दहाव्या पर्वापासून ही लीग पुन्हा एकदा सर्व 12 शहरांत खेळली जाणार आहे. आयपीएलप्रमाणेच या लीगमध्ये राऊंड रॉबीन पद्धतीने सर्व संघ एकमेकांविरुद्ध लढतील.

गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि सर्वात महागडा खेळाडू पवन सेहरावत या नव्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे. गेल्या हंगामाला दुखापतीमुळे तो मुकला होता. पण गेल्या वेळची कसर भरून काढण्यासाठी गेले दोन महिने त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.

गतविजेते जयपूर पिंक पँथर्सने नवव्या पर्वात अंतिम फेरीत पुणेरी पलटण संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते.  या लीगचा अहमदाबादचा पहिला टप्पा 2 ते 7 डिसेंबर असा चालेल. त्यानंतर बंगळुरू (8 ते 13 डिसेंबर), पुणे (15 ते 20 डिसेंबर), चेन्नई (22 ते 27 डिसेंबर), नोएडा (29 डिसेंबर ते 3 जानेवारी 2024), मुंबई (5 ते 10 जानेवारी 2024), पाटणा (26 ते 31 जानेवारी), दिल्ली (2 ते 7 फेब्रुवारी), कोलकता (9 ते 14 फेब्रुवारी) आणि पंचकुला (16 ते 21 फेब्रुवारी) असे टप्पे पार पडणार आहेत.