फॅमिली फर्स्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> तृप्ती भोईर, अभिनेत्री-निर्माती

मी देशांतर्गत विमानसेवा बंद होण्याआधी एक दिवस चेन्नईला आले. चेन्नईत माझी सासुरवाडी आहे. माझे पती म्युझिक डायरेक्टर आहेत. ते तमीळ फिल्म करत होते. त्यामुळे ते आधीपासून चेन्नईला होते. लॉकडाऊन सुरू होण्याआधी मी मुंबईत माझ्या पहिल्या हिंदी सिनेमाचं काम सुरू केलं होतं. म्हणजे शूटिंग सुरू नव्हती झाली, पण मोठय़ा प्रोडक्शनकडून स्क्रीप्ट अप्रूव्ह झाली होता. त्या उत्साहात मी कामाला लागले होते. मुंबईतून पाय निघत नव्हता. कामापेक्षा फॅमिली महत्त्वाची असल्यामुळे मी चेन्नईला आले.

चेन्नईत लॉकडाऊन फार कडक होतं. त्यामुळे खूप सवयी बदलल्या गेल्या. या संकटाने दोन चेहरे दाखवले. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह… अनेकांनी जवळची माणसं गमावली. अनेकांवर नोकऱया गेल्याने आर्थिक संकट ओढवलं. खाण्यापिण्याचे हाल झाले. हा कोरोनाचा निगेटिव्ह चेहरा होता. पण पॉझिटिव्ह चेहरा हा की, अनेकांना चांगल्या सवयी लागल्या. मदतीला बाई किंवा नोकर मंडळी नसल्याने घरातील सर्वांनी कामे वाटून घेतली. चेन्नईच्या घरी माझे सासू-सासरे 74- 75 वर्षांचे आहेत. सासूबाईंची मोठी बहीण 84 वर्षांची…तिघेही डायबेटीक. त्यामुळे खबरदारी म्हणून आधी घरातील नोकरचाकरांना सुट्टी दिली. मात्र तरी त्यांचे पगार आम्ही प्रत्येक महिन्यात करतोय.

या दिवसांत फॅमिली बॉडिंग वाढले. बाकी सगळं द्वितीय स्थानावर तुमची फॅमिली प्रथम. तुमचं काम, तुमचं प्रोफेशन तुमची डिग्निटी हे दुय्यम, त्याआधी तुम्ही कुणाची लेक, पत्नी, सून आहात… ही भावना प्रथम स्थानावर आली. अलीकडच्या दिवसांत ही भावना थोडी कुठेतरी निसटून चालली होती. प्रत्येक जण आपापल्या करीयरच्या मागे धावत होतो. आपल्याला हॉटेलात खायची चमचमीत सवय असते. ती लॉकडाऊनमध्ये मोडली. रोज रात्री झोपण्याआधी मी उद्या काय डिश बनवायची याचा विचार करते. बाहेरून मागवायच्या जिन्नसाची यादी करते. दुसरं म्हणजे मांसाहार खाल्याशिवाय राहू शकत नाहीत असं म्हणणारे या दिवसात काही काळ शाकाहारी झाले. आम्ही तर खूप दिवस भाज्यांवर होतो. घरात एकढय़ा डिश बनवल्या की, मांसाहाराची आठवण आली नाही. घरातील कामं सांभाळून दोन हिंदी सिनेमाच्या स्क्रिप्ट लिहिल्या.

एकूणच सध्याची स्थिती बघता मी अजून दोन महिने तरी चेन्नईमधून निघणार नाही. कारण माझ्यावर तीन ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे ऑफिसचं जे काही काम आहे, पेपर वर्क, लेखन हे सगळं घरून, ऑनलाइनरीत्या सुरू आहे. हळूहळू खबरदारी घेऊन शूटिंगला सुरुवात झालेय. पूर्ण सुरुवात व्हायला केळ लागेल. तोपर्यंत संयम बाळगूया!

शिकलेली कला कामी आली

फिल्मलाइनमध्ये येण्याआधी मी ब्युटिशियन होते. लोकांच्या घरी जाऊन मी ब्युटी सर्व्हिस द्यायचे. त्यावेळी माझी आर्थिक स्थिती चांगली नव्हती. लॉकडाऊनमध्ये मी पुन्हा या कलेकडे कळले. जी कला तुम्ही शिकला आहात, ती या काळात ’करेक्टली’ वापरली गेली. या दिवसांत घरातील सदस्यांचे हेअरकलर, आयब्रो तसंच हेअर कटिंगपासून सगळं केलं.