
नव्याने स्थापन झालेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने मार्चपासून बंद असलेला नाट्यगृहे पुन्हा सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सर्व गोष्टींची खबरदारी घेऊन नाटय़ व्यवसाय पुन्हा कसा सुरू करता येईल, याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक सचिवांना दिलं आहे.
जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची नुकतीच झूम मीटिंग झाली. त्या मीटिगमध्ये नाट्यगृहे सुरू करण्याबाबत आराखडा बनविण्यात आला. त्यानुसार रंगमंच कामगारांना प्रयोगापूर्वी सोशल डिस्टंसिंगचे पालन कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येईल, प्रत्येक नाट्यगृहांमध्ये नाटकाचे रोज दोनच प्रयोग होतील; ऑनलाईन तिकीट विक्रीसह प्रत्येक कलाकाराचं केगळं मेकअप किट; नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था शासकीय नियमांनुसार करणे, अशा काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. नाट्यगृहे सुरू झाल्यास या व्यवसायाकर अवलंबून असणाऱ्या तीन लाख कुटुंबियांना या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल, अशा आशयाचे निवेदन लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून देणार असल्याचे नाट्यधर्मी निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर, उपाध्यक्ष महेश मांजरेकर व कार्यवाह दिलीप जाधव तसेच निर्माते प्रशांत दामले, सुनील बर्के, राकेश सारंग यांनी सांगितले.

























































