समर्थ रामदासांच्या विचारांतील कालातीतता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. विमुक्ता राजे

रामदास हे तत्त्वचिंतक म्हणून जेवढे भावतात, तेवढेच लोकशिक्षक म्हणून जनमानसासमोर उभे राहतात. प्रयत्नवादी संत म्हणून गौरविलेल्या रामदासांनी धर्मशक्तीपेक्षा राष्ट्रभक्तीच देशाला तारेल हे पटवून दिले. रामदासांना समाज, माणसं घडवायची होती. त्यांना मूल्यांची जाणीव करून द्यायची होती आणि यासाठी त्यांनी मार्गदर्शक असे सात्त्विक वाङ्मय त्यांनी निर्माण केले. लोकोद्धाराचा कृतिशील प्रयोग करणाऱया समर्थांचे विचार नेहमीच भविष्याचा विचार करणारे ठरले.

सतराव्या शतकातील रामदासांचा काळ हा हिंदुस्थानी संस्कृतीच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक प्रकारच्या आणीबाणीचाच काळ होता. क्रूर, धर्मवेडय़ा, इस्लामी राजवटींच्या सत्तेच्या वरवंटय़ाखाली संपूर्ण हिंदुस्थानसह महाराष्ट्रही तीन शतकांपासून भरडून निघत होता. राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक कोंडीमुळे हिंदुस्थानी समाज संघटनाशून्य आणि स्वत्व हरवलेल्या अवस्थेत हीनदीन झालेला होता.

अशा समाजाला नवीन मूल्य देऊन, त्या समाजाची अस्मिता जागी करून, त्यास जीवन संजीवनी देण्यासाठी रामदासांचे वाङ्मय व तत्त्वज्ञान निर्माण झाले. त्या तत्त्वज्ञानामध्ये आत्मानंदाचे सर्वोत्तम मूल्य म्हणून तात्त्विक प्रतिपादन तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने निर्भय प्रयत्नवादी, कर्मरत व संघटित समाज जीवनाच्या सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाचाही अंतर्भाव आहे. रामदासांच्या तत्त्वज्ञानात वेदांत, सामाजिक आणि राजकीय विचारांचा मिलाफ दिसतो.

सुखी, समाधानी, आत्मनिर्भर व समर्थ अशा आदर्श समाजाचे एक मनोरम कल्पनाचित्र रामदासांनी आनंदवनभुवनात रंगविलेले दिसते-

स्वप्नीं जें देखिले रात्री ।
तें तें तैसेंची होतसे ।

समाजाला योग्य मार्ग दाखविणाऱया नेतृत्वाची उणीव होती. समाज गलितगात्र झालेला होता. त्यामुळे अशा समाजाला जागे करण्यासाठी राष्ट्राभिमानाचा वन्ही चेतविण्यासाठी कल्याणकारी नेतृत्व उभे करणे ही काळाची गरज ओळखून रामदासांनी आपले वाङ्मय लिहिले व कार्य केले. त्या काळात त्यांनी हिंदुस्थानभर फिरून सुमारे अकराशे मठ स्थापन केले व प्रत्येक मठाच्या महंतामधून नेतृत्व घडविण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांसारख्या नेतृत्वाचे सामर्थ्य ओळखून रामदासांनी त्यांना आपल्या लेखनातून बळ दिले-

लोकी लोक वाढविले । तेणे अमर्याद झाले ।

परमेश्वरप्राप्तीबाबत किंवा आध्यात्मिक आनंदाबाबत रामदासांनी लिहिलेच, पण त्या काळातील ते असे अपवादात्मक संत आहेत ज्यांनी राजकारणाचा विचारही आपल्या लेखनातून केला. रामदासांचे लेखन सर्वस्पर्शी असे आहे. व्यक्तिमत्त्व विकासापासून ते राजकीय मुत्सद्देगिरीपर्यंत व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवरची रामदासांची मते, विचार व भाष्य आजही मोलाचे व उपयुक्त आहेत.

संतपंचकातील ज्ञानेश्वरादी संतांपेक्षा रामदासांनी काळानुरूप दुसरी परंपरा निर्माण केली. कारण त्यांचे जीवित्व आणि कृतित्व इतरांपेक्षा वेगळे होते. रामदासांनी आपल्या जीवनात बारा वर्षे भ्रमंती केली, परंतु ही भ्रमंती फक्त धार्मिक हेतूने नव्हती. त्यात देशकालमानासह लोकस्थितीचेही त्यांनी निरीक्षण केले. पुढील काळात रामदासांनी जो उपदेश केला त्यात परमार्थाबरोबरच प्रपंचाचेही महत्त्व सांगितले. व्यवहारचातुर्यावर भर दिला. इतर संतांपेक्षा वेगळे असलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रामदासांनी नवा संप्रदाय निर्माण केला. नव्या संप्रदायासाठी व कालपरिस्थितीस अनुकूल अशी नवी दैवतं स्थापन केली. ही दैवतं शक्तीची आणि भक्तीची होती.

समर्थ संप्रदाय उभा करताना संघटना बांधली. लोकसंग्रह वाढविला व त्यात सामान्य माणसांचा सहभाग हे संघटनेचे सूत्र त्यांनी मांडले. लोकसंग्रहासाठी भिक्षेचे माध्यम त्यांनी शोधून काढले. रामदासांच्या तत्त्वज्ञानात पुरुषार्थ जागृत केलेला दिसतो. प्रपंच करताना, संघटनेत काम करताना व्यवहार चातुर्यावर भर दिला. हरिकथेबरोबरच राजकारणास व सावधपणासही रामदासांनी महत्त्व दिले. त्यांच्या कार्याचे व व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण येथे अधोरेखित होते-

मुख्य ते हरिकथा निरूपण ।
दुसरे ते राजकारण ।
तिसरे ते सावधपण । सर्वविषई ।।

रामदास हे तत्त्वचिंतक म्हणून जेवढे भावतात, तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक लोकशिक्षक म्हणून जनमानसासमोर उभे राहतात. प्रयत्नवादी संत म्हणून त्यांना गौरविले जाते. धर्मशक्तीपेक्षा राष्ट्रभक्तीच देशाला तारेल हे त्यांनी तत्कालीन तरुण पिढीला पटवून दिले. रामदासांना समाज जागवायचा होता, माणसं घडवायची होती, मूल्यांची जाणीव करून द्यायची होती. त्यासाठी प्रतिक्षणी मार्गदर्शक ठरेल असे उदंड सात्त्विक वाङ्मय त्यांनी निर्माण केले. लोकोद्धाराचा कृतिशील प्रयोग रामदासांनी केला. अवनत समाज परिस्थितीवर रामदासांनी फक्त उपाय शोधले नाहीत, तर उपाययोजनासुद्धा केल्या. रामदास विचारवंत होते तसेच क्रियाशील पुरुषही होते. त्यांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची सांगड कमालीची प्रभावी ठरली-

केल्याने होत आहे रे ।
आधी केलेची पाहिजे ।

रामदासांच्या कार्यामुळे व तत्त्वज्ञानामुळे त्यांना ‘संत’ ही उपाधी आहेच, परंतु ‘समर्थ’ ही उपाधी अधिक सार्थ ठरते. त्यांच्या उपदेशामध्ये पारमार्थिक उपदेशापेक्षा ऐहिक जीवनातील गलबला सोडवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणून संतपंचकात रामदास वेगळे दिसतात. इतर संतांच्या वाङ्मयाचे आणि जीवनाचे केंद्र हे धर्म होते, परंतु रामदासांच्या काळात धर्माबरोबरच राजकारण हेही केंद्र निर्माण झाले होते. म्हणूनच रामदासांनी धर्माबरोबरच राजकारण, समाजकारणही केले. रामदासांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानास राजकारण व समाजकारण ही केंद्रे मिळाली. म्हणून रामदासांचे व्यक्तिमत्त्व बहुकेंद्री झाले.

संत म्हणून रामदास सर्वपरिचित होते तसेच लोकशिक्षक, लोकनेता, नीती शिक्षक, गुरू, सामर्थ्याचे भोत्ते होते. त्याचप्रमाणे आणखीही पैलू गवसले. राष्ट्रचिंतक, सुसंवादक, संघटक, व्यवस्थापक हे गुणही रामदासांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून आले. तसेच समुपदेशक हा अत्यंत वेगळा पैलू शोधाअंती हाती गवसला. आधुनिक काळात हे गुण वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये आढळतात. रामदासांचे वाङ्मय अभ्यासताना असे लक्षात आले की, एकाच व्यक्तीत हे सर्व गुण सामावले आहेत. त्याआधारे रामदास हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते (Multi-Facisinated Personality) असे म्हणता येते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे विविध पैलू त्यांनी रचलेल्या वाङ्मयाआधारे गवसले. रामदासांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्व पैलू आणि विचार हे केवळ त्या काळाशीच सुसंगत होते असे नाही, तर ते आजच्या काळाशीही तितकेच सुसंगत आहेत.

संत हा जसा साक्षात्कारी तत्त्वज्ञ असतो तसा तो समाजसुधारकही असतो याचा पुरेपुर प्रत्यय समर्थ रामदासांच्या वाङ्मयातून येतो. समाजसुधारणेच्या अंगाने रामदासांनी निरूपलेली ही शाश्वत मूल्ये व नैतिक विचार आजच्या काळातही उपयुक्त ठरतात. एकविसाव्या शतकाच्या वाटचालीतही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील अशीच आहेत. त्यातूनच त्यातील कालातीतता सिद्ध होते आणि हीच रामदासांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची विशेष महत्ता आहे.