कोयनेच्या पाणीवापरात कपातीचा प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमानामुळे महाराष्ट्राला वरदायी ठरलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर सिंचन आणि वीज निर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. धरणाचे पावसाळी वर्ष 1 जून ते 31 मे याप्रमाणे मोजले जाते. या वर्षीचा पावसाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे 1 जूनपर्यंत धरणामध्ये अवघा 17.64 टीएमसी पाणीसाठा उरला होता. मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात 440 मिलीमीटर व पाणी आवकमध्ये 39.71 टीएमसी इतकी घट झाली आहे. 1 जून ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सिंचन व वीजनिर्मितीसाठी अनुक्रमे 5.46 टीएमसी व 23.03 टीएमसी वापर झाला आहे.

कोयना धरणामधून सिंचनासाठी 42.70 टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. त्यापैकी 1 जुलै ते 14 ऑक्टोबर या खरीप हंगामामध्ये 4.39 टीएमसी पाणीवापराचे प्रकल्पीय नियोजन आहे. कोयना प्रकल्पांतर्गत लाभ होणारे बहुतांश सिंचन क्षेत्र सांगली जिह्यातील असल्याने सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार सिंचनासाठी धरणामधून विसर्ग सोडण्यात येतो. मागील वर्षी कोयना धरणातून खरीप हंगामामध्ये झालेला पाणीवापर 0.47 टीएमसी इतका मर्यादित होता. तथापि, चालू वर्षी खरीप हंगामामधील ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये सांगली सिंचन विभागाकडून मागणी प्राप्त झाल्यामुळे कोयना धरणामधून 2.36 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा दोन टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे. या परिस्थितीचा विचार करून धरणामधील उपलब्ध पाणीसाठय़ाच्या कमतरतेमुळे रब्बी व उन्हाळी हंगामामधील नियोजित पाणीवापरात 11.71 टीएमसी कपात प्रस्तावित केली आहे. त्यापैकी सिंचनाच्या पाणी वापरात 2.86 व वीज निर्मितीच्या पाणीवापरात 8.85 टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीज निर्मितीसाठी एकूण 70 टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याविषयी सूचना केली आहे.

कोयना धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे 25.45 व 12.41 टीएमसी असे एकूण 37.86 टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. तथापि उपरोक्त कपातीनुसार रब्बी व उन्हाळी हंगामातील पाणी वापर 35 टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी सातारा जिह्यासाठी 3 टीएमसी व सांगली जिह्यासाठी 32 टीएमसी या मर्यादेत पाणीवापर करणे नियोजित आहे.

पुढील कालावधीमधील नियोजन

– यावर्षी पिण्याच्या पाण्यासह सिंचन व वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध असावे, तसेच पुढील वर्षीच्या पावसाळ्यातही जून-जुलैमध्ये पाऊस लांबला, तर पिण्याच्या पाण्यासह आवश्यक गरजांसाठी किमान पाणीसाठा उपलब्ध असावा, याचा विचार करून यावेळी धरणामधील पाणीसाठय़ाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी रब्बी हंगामामधील प्रत्यक्ष होणारा पाणी वापर व धरणामधील शिल्लक पाणीसाठा याचा विचार करून मार्च 2024 मध्ये उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे फेर नियोजन करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.