
सामना ऑनलाईन । मेक्सिको सीटी
रशियात होणाऱ्या २१ व्या फुटबॉल विश्वचषकाला अवघे ८ दिवस बाकी आहे. या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेला मेस्किकोचा संघ वादात सापडला आहे. मेक्सिकोमध्ये आयोजित एका निरोपाच्या पार्टीमध्ये फुटबॉल खेळाडूंसह वेश्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता असे नोटास गासिप पत्रिका या टीव्ही चॅनेलने फोटोसह दाखवले.
या वृत्तानुसार, फिफामध्ये खेळणाऱ्या मेक्सिकन फुटबॉल संघातील ९ खेळाडूंनी एका खासगी जागेमध्ये पार्टी केली. या पार्टीत ३० पेक्षा जास्त वेश्या सहभागी झाल्या होत्या. हा प्रकार उघड झाल्यानंतर खेळाडू वादात सापडले. परंतु मेक्सिकन अधिकाऱ्यांनी खेळाडूंवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही हे स्पष्ट केले आहे. या पार्टीमध्ये मेक्सिकन फुटबॉल संघाचा गोलकिपर गुईलेरमो ओचोआ आणि प्रमुख स्ट्रायकर राऊ जिमेनेजही सहभागी झाला होता.
मेक्सिकन फुटबॉल संघाचे महासचिव गुईलेरमो कांटू यांनी म्हटले की, ‘खेळाडूंनी आपल्या मोकळ्या वेळेत ही पार्टी केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही. मोकळ्या वेळेमध्ये खेळाडूंना आपल्या वैयक्तीक आयुष्यात काहीही करण्याची मुभा आहे.’ याआधी सप्टेंबर २०१०मध्ये मेक्सिन खेळाडूंनी महिलांसोबत पार्टी केली होते तेव्हा त्यांना दंड भरावा लागला होता.































































