पोक्सो आरोपीची 10 वर्षांच्या शिक्षेतून सुटका

आधीचे दोन प्रेमसंबंध झाल्यानंतर पीडितेने तिसऱया प्रियकरावर बलात्काराचा आरोप केला. घटना घडली तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा केला. या प्रकरणात पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी सादर केलेले पुरावे, पीडितेने दिलेला जबाब तसेच या प्रकरणात सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षी पुराव्यांतून आरोपीचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नाही, असेही न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. 12 मार्च 2019 रोजी शिक्षा सुनावताना विशेष पोक्सो न्यायालयाने पुरावे योग्य प्रकारे ग्राह्य धरले नाहीत, असा ठपकाही न्या. चव्हाण यांनी ठेवला.

2013 मध्ये पीडिता आणि आरोपी महेश जाधवचे प्रेमसंबंध जुळले. नोव्हेंबर 2013 मध्ये महेश वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी टिटवाळा येथे घेऊन गेला. तेथे एका हॉटेलमध्ये त्याने बलात्कार केला. त्यानंतर महेश इतर कोणाशी बोलू द्यायचा नाही. पीडितेने जानेवारी 2014 मध्ये महेशसोबत बोलणे बंद केले. फेब्रुवारी महिन्यात तिला मासिक पाळी आली नाही. मार्च महिन्यात तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ती साडेचार महिन्यांची गरोदर असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले.