Pulwama Attack देश का नंबर वन दुश्मन जैश-पाकिस्तान मुर्दाबाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुलवामा जिह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भयंकर हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा देशभरातून संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबईसह राज्यभरातून होत आहे. नाक्यानाक्यावर, चौकाचौकात दहशतवादी आदिल दारची प्रतिकृती आणि पाकिस्तानचा झेंडा, पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. जैश-ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या प्रतिमेला चपला मारून आंदोलनही करण्यात आले. ‘देश का नंबर वन दुश्मन मजहूर आणि पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणंनी हिंदुस्थानवासीयांनी देश दणाणून सोडला. मुंबईतही ठिकठिकाणी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वांद्रय़ात निषेधमोर्चा
विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे जिल्हा अधिकारी कार्यालय येथून निषेधमोर्चा काढण्यात आला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्याचा पुतळाही जाळण्यात आला. पाकिस्तानविरोधी घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला.

विक्रोळीत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’
विक्रोळीत आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली निषेधमोर्चाचे आयोजन करण्यात आले. विक्रोळी स्थानकाजवळ निषेधमोर्चा काढून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख रमेश कोरगावकर, महिला विभाग संघटिका संध्या वढावकर, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रिक्षाचालक सेनेकडून निषेध
महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, अंधेरी पूर्वच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रिक्षाचालक सेना, अंधेरी पूर्वचे अध्यक्ष उपविभागप्रमुख सुभाष कांता सावंत, शाखाप्रमुख नरेश कांता सावंत, भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य, राम साळवी आणि रिक्षाचालक तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

गोरेगावमध्ये जोरदार घोषणाबाजी
गोरेगाव रेल्वे स्थानक येथे विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विभाग संघटक, स्थापत्य समिती अध्यक्षा साधना माने, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

दादरमध्ये संताप
दादरमध्ये पाकिस्तानविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेविका श्रद्धा जाधव, उपविभागप्रमुख अश्विन शहा, उपविभाग संघटिका माधुरी मांजरेकर आणि मोठय़ा संख्येने शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली.

भारतमाता येथे आंदोलन
दहशतवाद्यांना वेळोवेळी पाठीशी घालणाऱया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाळून भारतमाता सिनेमा येथे पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. शिवसेना शिवडी विधानसभेच्या वतीने या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला.

दक्षिण मुंबईतही निदर्शने
शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईत दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. मोर्चात विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. जीना हाऊस येथे शिवसैनिकांनी ‘भारतीय सेना भवन’ असा बॅनर लावला.

घाटकोपरमध्ये जोरदार आंदोलन
घाटकोपरमध्ये विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. त्यावेळी विभाग संघटक डॉ. भारती बावदाने, नगरसेवक सुरेश पाटील, दीपक हांडे, उपविभागप्रमुख सुभाष पवार, शिवसैनिक उपस्थित होते.

सांताक्रुझ – कुर्ल्यात निषेध रॅली
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सांताक्रुझमध्ये विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी वाकोला ब्रिज येथे निषेध रॅली काढण्यात आली. तर कुर्ल्यात आमदार मंगेश कुडाळकर, विभाग संघटक संजना मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी स्थानिक उपस्थित होते.

सेंच्युरी बाजार, कांदिवलीत निषेध
वरळीच्या सेंच्युरी बाजार येथे आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदिवलीत विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

सिद्धिविनायककडून 51 लाख
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून 51 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातील क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून 25 लाखांची मदत करण्यात येणार आहे.