शर्यतबंदीमुळे खिलार बैल नामशेष होण्याच्या मार्गावर! बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शर्यतीवरील बंदीमुळे खिल्लार बैल नामशेष होण्याच्या मार्गावर असून, पेटा संघटनेच्या कार्यकर्त्यांची हटवादी भूमिका शेतकऱयांचे नुकसान करणारी ठरली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी तत्काळ उठवावी; अन्यथा यापुढील काळात ‘घोडे छोडो’ आंदोलन करण्याचा इशारा राहुरीतील शेतकऱयांनी दिला आहे. अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे नगर-मनमाड राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून देशीबैल वाचवावेत या मागणीसाठी राहुरीतील शेतकऱयांनी बुधवारी सकाळी नगर-मनमाड राज्यमार्गावर चक्काजाम आंदोलन छेडले. ढोल-ताशांच्या गजरात भंडाऱयाची उधळण करत शेतकऱयांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. शेतकऱयांनी आंदोलनस्थळी तब्बल 50 बैलजोडय़ा आणल्याने राज्यमार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती.

शेतकरी रवींद्र हापसे म्हणाले, पारंपरिक खिलार बैलाची जात वाढण्यासाठी शेतकऱयांचे कायमच प्रयत्न राहिले आहेत. शेतकऱयांकडून पाळीव प्राण्यावर अत्याचार होतात, ही अफवा उठविणाऱया पेटा संघटनेच्या लोकांना जनावरांचे पालन कसे केले जाते हे शेतकऱयाच्या दारात येऊन पाहावे. बैलाच्या शर्यतीवरील बंदीबाबत बोलणारे कत्तलखान्यांबाबत तोंड बंद ठेवत असल्याचे हापसे यांनी म्हटले.

बाळासाहेब जाधव म्हणाले, रेसकोर्सवर होणाऱया घोडय़ांच्या शर्यतीवर लाखोंचा सट्टा लागतो. मात्र, शेतकऱयाच्या बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली जाते, ही बाब दुर्दैवी आहे. बैलाच्या शर्यतीवरील बंदीची मागणी ही पारंपरिक संस्कृती मोडीत काढण्याचे काम असून, ही बंदी उठविण्यासाठी केंद्र शासनाला जाग येणे गरजेचे आहे; अन्यथा घोडे छोडो आंदोलन छेडण्यात येईल, असे ते म्हणाले.

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, आर. आर. तनपुरे, डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष करपे, माजी उपसरपंच प्रभाकर हरिश्चंद्रे, निखिल हापसे, दिशांत हरिश्चंद्रे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदन देण्यात आले.