
सामना ऑनलाईन । लातूर
‘राज्य शासनास मराठा समाजाच्यावतीने २० मागण्यांचे निवेदन यापुर्वीच देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता शासनासोबत चर्चा नाहीच. जे कोणी चर्चेसाठी गेलेले आहेत त्यांचा जाहिर निषेध करण्यात आला असून त्यांचा आंदोलनाशी संबंध नाही’ अशी भुमिका लातूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ९ ऑगस्ट रोजी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठाच काय पण शासकीय कार्यालयेही बंद करण्यास भाग पाडू, प्रत्येक गावातील रस्त्यावर मराठा समाज आपल्या गुराढोरांसह उतरलेला असेल त्याच प्रमाणे १ ऑगस्ट पासून मराठा समाजाच्या खासदार, आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी जाहिर करण्यात आले.
शहारातील राहिचंद्र मंगलकार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या ठरावांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ९ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईतील मोर्चात २० मागण्यांचे निवेदन शासनास दिलेले आहे. राज्य शासनाने या संदर्भातील सर्वच आंदोलनातील गुन्हे हे बिनशर्त परत घ्यावेत म्हणून ९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती जनआंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. या दिवशी राज्यातील प्रत्येक गावातील रस्त्यावर मराठा समाज आपल्या गुरा-ढोरांसह उतरलेला असेल. या आंदोलनात कांही उद्रेक झालाच तर त्याची जबाबदारी ही शासनावर राहील.
शासनास यापुर्वीच २० मागण्यांचे निवेदन देण्यात आलेल आहे त्यामुळे आता कुणाचीही मध्यस्थी अथवा चर्चा आम्हाला मान्यच नाही. जे कोणी चर्चेस गेले आहेत त्यांचा जाहिर निषेध या बैठकीत करण्यात आला असून त्यांचा आंदोलनाशी संबंध राहणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले.
१ ऑगस्ट रोजी राज्यतील प्रत्येक मराठा आमदार, खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती आंदोलनातील शहीदांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत म्हणून ५० लाख रुपये देण्यात यावेत. कुटूंबातील सदस्यास शासकीय नौकरीत सामाऊन घ्यावे. आंदोलनातील शहीद काकासाहेब शिंदे, तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकार्यांची एस.आय.टी तर्फे चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकार सोबत असहकार आंदोलन छेडण्यात येणार असून शासनाचा कोणताही कर भरला जाणार नाही असा ठराव या बैठकीत करण्यात आला आहे. तसेच या पुढील बैठकही परभणी येथे घेण्याचे ठरविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. लातूरमध्ये आज झालेल्या या बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील समन्वयक उपस्थित असल्याचेही सांगण्यात आले. त्याच प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयक आंदोलनची माहिती देतील असेही सांगण्यात आले.





























































