
उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने वाखरी पालखी तळावर आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱया ट्रक्टर ट्रॉलीचे टायर फोडून ऊस वाहतूक बंद पाडली, तर सरकारने ऊसदर जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या घरासमोर महिला आंदोलन करतील, असा इशारा आंदोलकांच्या पत्नींनी दिला आहे. त्यामुळे ऊसदर आंदोलन चांगलेच पेटले असल्याचे दिसत आहे.
तिसऱया दिवशी खर्डी येथील सीताराम कारखान्यावर आंदोलन करण्यात आले. आज (दि. 12) चौथ्या दिवशी श्रीपूर येथील पांडुरंग कारखान्यावर गव्हाणीत उतरत आंदोलन करण्यात आले. सुमारे पाच तास शेतकऱयांनी कारखान्याचे गाळप बंद पाडले. सकाळी आंदोलकांनी पंढरपूर तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱया ट्रक्टरचे टायर फोडले.
आंदोलकांची तब्येत बिघडली
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी समाधान फाटे व इतर तीन आंदोलकांची तब्येत बिघडत चालली असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनस्थळी भेट देत संताप व्यक्त केला. लवकरात लवकर ऊसदराचा तोडगा काढा आणि माझ्या वडिलांना वाचवा, अशी विनंती समाधान फाटे यांच्या मुलीने सरकारला केली आहे.


























































