
नोव्ही सॅड रेल्वे स्टेशन शेड कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. बांधकाम प्रकल्पांमधील भ्रष्टाचारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत राष्ट्रपती अलेक्झांडर वुचिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो लोक अनेक शहरांमध्ये शनिवारपासून लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली. राजधानी बेलग्रेड आणि इतर शहरांमध्ये रस्ते रोखले. आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच ध्वनी बॉम्ब सोडले. डझनभर लोकांना अटकही केली. त्यामुळे देशात लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष वाढत चालल्याचे चित्र आहे.
बेलग्रेडमध्ये अनेक ठिकाणी निदर्शकांनी धातूचे बॅरिकेड्स आणि कचऱयाचे डबे टाकून रस्ते अडवले. साबा नदीवरील पुलावर त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नोव्ही सॅडमध्ये आंदोलकांनी सत्ताधारी लोकप्रिय सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या कार्यालयावर अंडी फेकली. शनिवारी रात्री बेलग्रेडमध्ये सुमारे 1 लाख 40 हजार लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान, रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनाप्रसंगी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि ध्वनी बॉम्ब सोडले. यात अनेक आंदोलक जखमी झाले.
नेमके कशामुळे आंदोलन पेटले
1 नोव्हेंबर 2024 रोजी नोव्ही सॅड रेल्वे स्टेशनचा शेड कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारविरोधात डिसेंबरपासून आंदोलन पेटले. जिकडे तिकडे निदर्शने सुरू झाली. गेल्या 7 महिन्यांपासून हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी उग्र होत चालले आहे. बांधकाम प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
तत्कालीन पंतप्रधान, वाहतूक मंत्र्यांचा राजीनामा
रेल्वेचे शेड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान मिलोस वुसेविक यांना 28 जानेवारी 2025 रोजी राजीनामा द्यावा लागला. यापूर्वी माजी परिवहन मंत्री गोरान वुसेक यांनीही राजीनामा दिला होता. नोव्ही सॅड घटनेत13 जणांवर भ्रष्टाचारे आरोप होते. त्यात गोरान वुसेक यांचेही नाव होते. देशातील तणाव आणखी वाढू नये आणि वातावरण शांत व्हावे यासाठी पदाचा राजीमामा देत असल्याचे वुसेविक यांनी म्हटले होते.
राष्ट्रपती वुचिक यांचा दुसरा कार्यकाळ
अलेक्झांडर वुचिक हे 2017 पासून सर्बियाचे राष्ट्रपती आहेत. त्यांचा दुसरा कार्यकाळ 2027 मध्ये संपत आहे. त्यानंतर संसदीय निवडणुकाही होणार आहेत. मात्र, आंदोलकांमध्ये त्यांच्याविरोधात तीव्र संताप असून ते वुचिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर राष्ट्रपती सातत्याने निवडणुका घेण्यास नकार देत आहेत. वुचिक हे 2012 ते 2014 पर्यंत उपपंतप्रधान होते. 2014 ते 2017 पर्यंत पंतप्रधान होते. त्यानंतर ते राष्ट्रपती झाले.