करण जोहरच्या पार्टीत मंत्री असल्याचा पुरावा द्या, अन्यथा माफी मागा! महापौरांचे आशीष शेलार यांना थेट आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपट दिग्दर्शक करण जोहर  याने आयोजित केलेल्या पार्टीत राज्य सरकारचा एक मंत्रीदेखील सहभागी झाला होता, असा गंभीर आरोप करणाऱ्या भाजपच्या आमदार आशीष शेलार यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट आव्हान दिले आहे. त्या पार्टीत मंत्री असल्याचा पुरावा द्या अन्यथा जाहीर माफी मागा, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.

करण जोहर याने आयोजित केलेल्या पार्टीत गर्दी झाली होती आणि या पार्टीवरून आशीष शेलार यांनी थेट सरकारवर आरोप केले आहेत. मात्र शेलार यांची ही भूमिका म्हणजे खोटे बोला, पण रेटून बोला असा प्रकार असल्याचे महापौर निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत महापौर म्हणाल्या. शिवसेना आणि आपल्या बदनामीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आम्ही शिवसेनेच्या रणरागिणी आहोत. अशा घाणेरडय़ा आरोपांनी खचून जाणार नाही. केवळ आरोप करू नका. नाहीतर जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण केल्याबद्दल जाहीर माफी मागा, असे आव्हानच महापौरांनी दिले. संविधान आणि कायद्याने अधिकार दिला म्हणून नाहक अवमान करण्यासाठी शेलारांचे हे उपद्व्याप सुरू असल्याचा टोलाही महापौरांनी शेलारांना लगावला आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांच्या आरोपांचाही महापौरांनी यावेळी समाचार घेतला.

भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात

आशीष शेलार आमदार, मंत्री झाल्यानंतरही त्यांचा जीव पालिकेत घुटमळत आहे. सत्ता नसल्याने तडफडणाऱ्या जिवाला त्यांनी आता मोकळे करावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपचे नगरसेवक कार्यक्षम नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांमध्ये स्वतः मोठे सिद्ध करण्याची स्पर्धाच लागली असल्यामुळेच शिवसेनेवर आरोप केले जात असल्याचे महापौर म्हणाल्या. शेलारांच्या कार्यपद्धतीला कंटाळल्यामुळे भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचेही महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.