इंडियन म्युझिक ग्रुपशी माझं विशेष नातं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज संध्याकाळी पं. शौनक अभिषेकी यांची मैफल सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ने आयोजित केली आहे. सोबत अनुपमा भागवत यांचे सतार वादन आहे. निमित्त आहे आय. एम. जी. चा पन्नासावा वर्धापन दिन. या मैफलीविषयी तरुणांच्या मनात मोठी उत्सुकता आहे.

फोर्ट परिसरात वसलेले सेंट झेवियर्स महाविद्यालय पाश्चिमात्य संस्कृतीचे लेणे लेऊन जगणारे विद्यासंकुल, असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात तो समज खरा आहे. मात्र यासोबतच अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, अभिनय, पारंपरिक संस्कृती, वाङ्मय यांची झेवियर्सवाल्यांना चांगली जाण आहे. संत साहित्य, कविता मराठी वाङ्मयाविषयी त्यांना जवळीक वाटते. सेंट झेवियर्सच्या ‘मराठी वाङ्मय मंडळा’ने गेल्या वर्षी शतक महोत्सव साजरा केला. तब्बल शंभर वर्षे सातत्याने कार्यरत राहणे ही सोपी गोष्ट नव्हे. विशेष म्हणजे आज सेंट झेवियर्सचा ‘इंडियन म्युझिक ग्रुप’’ पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयाने आज पंडित शौनक अभिषेकी यांचे गायन आणि अनुपमा भागवत यांचे सतार वादन अशी दुग्धशर्करायुक्त मैफल आयोजित केली आहे. ही मैफल सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.

आजच्या मैफलीविषयी बोलताना पं. शौनक अभिषेकी म्हणतात, ‘‘सेंट झेवियर्स महाविद्यालयाशी माझे जुने नाते आहे. त्यांच्या ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ने शास्त्रीय संगीत क्षेत्रात चांगला दबदबा निर्माण केला आहे. आय. एम. जी. ही संस्था अनेक वर्षे माझ्या संपर्कात आहे. मी सेंट झेवियर्समध्ये यापूर्वी गायलेलो आहे. विशेष म्हणजे माझे वडील पंडित जितेंद्र अभिषेकी यांनाही आय. एम. जी. ने गायनासाठी निमंत्रित केले होते. मी वडिलांसोबत इथे आलो होतो. आय. एम. जी. चे कार्यक्रम ऐकायला दूर दूरहून श्रोते येतात. त्यात साहजिकच तरुणांचा भरणा अधिक असतो.’’

तरुण पिढीसमोर गायकी सादर करायला शौनक यांना विशेष आवडते. ते म्हणतात, ‘आजची तरुण पिढी रॉक संगीत ज्या तन्मयतेने ऐकतात त्याच एकाग्रतेने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकतात. त्यांना आवडेल ते सारे यूटय़ूबच्या एका टचवर उपलब्ध आहे. त्यामुळे ते बहुश्रुत आहेत. शास्त्रीय संगीत बैठकीचे संगीत आहे. शास्त्रीय संगीत हे मास अपील असलेले संगीत कधीच नव्हते, भविष्यातही ते नसेल. पण इथे आवर्जून उल्लेख करायला हवा की, सेंट झेवियर्समध्ये शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत ऐकायला रसिक गर्दी करतात.’

एकूण शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या सद्य परिस्थितीबद्दल शौनक यांच्या मनात संमिश्र भाव आहेत. याविषयी शौनक आपले मन मोकळे करतात. ते म्हणतात, ‘उपजत हिंदुस्थानी संगीताकडे दुर्लक्ष होतेय अशी भावना कधी कधी मनात येते. पण दुसऱया क्षणी मनात आशावादाचा अंकुर फुलतो. मग खात्री वाटू लागते की, जोपर्यंत जगात हिंदुस्थानी संस्कृती जिवंत आहे, तोपर्यंत अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला तेजस्वी भवितव्य आहे. आपली तरुण मुले-मुली जिद्दीने शास्त्रीय संगीत शिकत आहेत. गायन, वादन, नृत्य, अभिनय अशा कलांचे आकर्षण कधी कमी होणार नाही. हे मात्र लक्षात ठेवायला हवे की, या कला मासच्या नसून क्लासच्या आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे गर्दी आणि दर्दी यातला जो फरक आहे याचे भान कायम ठेवायला हवे.’
निलय वैद्य