
आसावरी जोशी
पु.लं… आपले पु.लं… आपल्या महाराष्ट्राचा आनंदठेवा. पुलोत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही विशेष कारणाची गरज नसते. साहित्यप्रेमी कधीही, केव्हाही पुलंचं साहित्य वाचून, पाहून आनंद सोहळा साजरा करतात. मग ‘फुलोरा’साठीही पुलं हेच निमित्त पुष्कळ होतं. जाणून घेऊया पुलंच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी…
नियम हे अपवादानेच सिद्ध होत असतात. काही गोष्टींना, व्यक्तींना या नियमांच्या चौकटी लागू होऊ नयेत असे वाटते. किंबहुना त्या लागू होत नाहीतच. आमच्या पत्रकारितेचे, वर्तमानपत्राचे, पुरवणीचे काही नियम असतात. विशेषतः पुरवणीसाठी विषय निवडताना ते ताज्या घडामोडींवर आधारीतच असणे अपेक्षित असते. त्याप्रमाणेच विषयांची निवड केली जाते.
पु. ल. देशपांडे अर्थात आपले पुलं आपल्या महाराष्ट्राचा आनंद ठेवा. समस्त मराठीजनांना हसवण्याचं आनंदी ठेवण्याचे कार्य विहीत कर्तव्य असल्याप्रमाणे पुलं करीत राहिले. अगदी आजतागायत. होय आजतागायतच. कारण केवळ पुलंच्या साहित्यावर जगणारे, मनमुराद हसणारे… त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचं पारायण करणारे अस्सल पुलप्रेमी वाचक या वाचनातून रोजच पुलोत्सव साजरा करीत असतात. मग ‘फुलोरा’लाही पुलंवर कालच आलेला चित्रपट एवढं निमित्त पुरेसं होतं. आणि पुरवणीच्या लौकिक नियमाला बगल देऊन आम्हीही तुम्हा वाचकांसोबत पुलोत्सव साजरा करतोय.
पुलं म्हणजे सबकुछ. कोणतंही क्षेत्र पुलस्पर्शापासून वंचित राहिलं नाही. साहित्य, कला, संगीत, नाटक, काव्य, चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन… किती माध्यमांची नावं घ्यावीत. याव्यतिरिक्त पुलं आणि सुनीताबाईंच्या घरी होणाऱया गान मैफलींविषयी वाचणं म्हणजे पुलंचं संगीतप्रेम आणि दिग्गजांचं गाणं प्रत्यक्षात अनुभवण्यासारखंच… या पुलं मैफलीतून माहीत नसलेले पुलं शोधण्याचा प्रयत्न.
पुलंनी सूर व लय यांच्यावर मनापासून प्रेम करताना कोणत्याही घराण्याचा गंडा बांधला नाही. पुलंच्या पुण्याच्या घरी वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, केसरबाई केरकर, कुमार गंधर्व यांच्या मैफली रंगत. या मैफली सलग चालत. आदल्या दिवशी भीमसेनजी गाऊन गेल्यानंतर दुसऱया दिवशी वसंतराव देशपांडेंचे गाणे जरा जास्त रंगले. निकोप स्पर्धेच्या खिलाडूवृत्तीने पंडितजींनी पुन्हा दुसऱया दिवशी तब्बल साडेतीन तास मैफल रंगवली. पहाटेपासून सुरू झालेल्या या मैफलीसाठी पुलंनी तबलावादक आणि श्रोते स्वतः सायकलवर जाऊन जमवले होते.
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब सहज बोलून गेले ‘तुमच्या घरी काय. तुम्ही आणि सुनीताबाई सतत खो खो हसत असणार’ यावर पुलं म्हणाले, तुमच्या घरीसुद्धा तुमची पत्नी तुमच्यावर तलवार घेऊन वार करते आणि तुम्ही ढाल घेऊन चुकवताय असेच दृश्य असेल नाही?’
पुलंना घरातच वाचनाचे आणि संगीताचे संस्कार लाभले. घरात संगीताच्या बैठका होत असत. पुलं गाणं घरीच रेडिओ ऐकून शिकले. रेडिओ सतत ऐकून त्यांचे कान आणि गळा तयार झाला. त्यांच्या आजीचा गळा फार गोड होता. हा गाण्याचा वारसा आजीकडून त्यांच्या आईकडे आणि आईकडून पुलंना मिळाला. आईचा गळा मोकळा व सुरेल होता. घरी रोज गाण्याची मैफल व्हायची. पुलं पेटीवर, धाकटा भाऊ तबल्यावर असे रोजचे दृश्य असायचे.
पुलंनी संगीतकार म्हणून 1947 मध्ये ‘कुबेर’ चित्रपटातून पदार्पण केले. पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशींसारख्या दिग्गजांनी पुलंच्या संगीत दिग्दशंनाखाली गाणी गायली. इंद्रायणी काठी, नाच रे मोरा, माझे जीवन गाणे ही पुलंची गाणी आजही लोकप्रिय आहेत. गुळाचा गणपती, देवबाप्पा, जोहार मायबाप जोहार, एक होता विदुषक हे पुलंचे चित्रपट खूप गाजले.
1937 पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. 1955 मध्ये पुलं आकाशवाणीत नोकरीला लागले. 56-57 मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाटय़निर्माते झाले. 1958 मध्ये आकाशवाणीने पुलंना युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला पाठवले. 1959 मध्ये पुलं हिंदुस्थानातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले.
पुलंचे संगीत हे पहिले प्रेम होते. आपल्या संगीताच्या प्रेमाबद्दल सांगताना पुलं म्हणतात की आमच्या घरी बहिणीची मंगळागौर जागवायचे त्या रात्रीच्या कल्लोळाने मला आनंद दिला.
त्यांच्या मातोश्रींनी त्यांना हौसेने पेटी शिकायला पाठवले. वयाच्या दहाव्या वर्षी पुलंनी बालगंधर्व यांच्यासमोर ‘सत्यवदे वचनाला’ हे गीत वाजवून त्यांच्याकडून शाबासकी मिळवली.
दूरदर्शनच्या पहिल्यावहिल्या प्रसारणासाठी नेहरूंची मुलाखत घेणारे पुलं हे हिंदुस्थानी दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱया मोजक्या प्रतिभावंतांत पुलंचा समावेश होता.
पुलंचे वडील एका कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना त्यांना जेवणाचा भत्ता मिळत असे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्या दिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही. या सज्जनपणाचे आणि तत्त्वनिष्ठतेचे संस्कार पुलंवर झाले.
पुलंच्या आजोबांचे नाव दुभाषी, पण लेखक म्हणून त्यांनी ऋग्वेदी हे नाव धारण केले. त्यांच्याकडे वक्तृत्व व विनोदबुद्धी होती. अनेक भाषांचे ते जाणकार होते. रवींद्रनाथांचे वाङ्मय ते आवडीने वाचत. गीतांजलीचे मराठी भाषांतर अभंग गीतांजली पुलंच्या आजोबांनी केले आहे. पुलंच्या भाषाप्रेमाचे मूळ येथे सापडते. पुलं बंगाली आणि कानडी उत्तम जाणत होते.
दिल्ली दूरदर्शन सुरू झाले त्यावेळी पहिला कार्यक्रम पुलंनी केला होता. दूरदर्शनवर बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अशावेळी द्रुतगतीत तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.
पुलंच्या लेखणीतून…
उपजीविकेसाठी आवश्यक शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढय़ावरच थांबू नका. एखाद्या कलेशी मैत्री करा. ती कला तुम्हाला जगायचे कसे शिकवेल.
मैत्रीची सोपी व्याख्या – रोज आठवण यावी असं काही नाही. रोज भेट व्हावी असंही काही नाही. रोज बोलणं व्हावं असं काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि याची तुला जाणीव असणं म्हणजे मैत्री.
माझ्या लहानपणाबद्दल उगाच असे म्हटले जाते की माझे बालपण फार गरिबीत, हलाखीत गेले. खरे पाहता असे मुळीच नाही. फक्त ते आजच्या इतके सुस्थितीत नव्हते इतकेच. पण खरे सांगायचे तर, माझ्या लहानपणी आम्ही गरीब आहोत की श्रीमंत हा विचार करायला आम्हाला वेळच नव्हता. अनेक महत्त्वाची व्यवधाने आमच्या मागे होती. आज बालगंधर्वांचे गाणे आहे ते ऐकायला जा. उद्या काय सी. के. नायडूंची मॅच आहे. ती पाहायला गच्चीवर मोक्याची जागा बघ. अशा अनेक अपूर्वाईच्या गोष्टी करण्यात गरिबी कधी जाणवलीच नाही.
एका वाण्याच्या दुकानात एक छोटी मुलगी आली. वाण्यासमोर तिने पणती ठेवली. आणि सांगितले ‘धा पैशाचे तेल द्या.’ वाणी खेकसला पणती ठेवायला आता काय दिवाळी आहे? मुलगी म्हणाली, ‘धा पैशाचे तेल घ्यायला एवढी पणती पुरे’. दहा पैशांच्या तेलाने ती पणती अर्धीसुद्धा भरली नाही. तेव्हापासून दिवाळीत उजळलेल्या पणत्यांचा प्रकाश मला असह्य होतो.























































