मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग हवा, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, दुकानांवरील मराठी भाषेतील पाटय़ांचा कायदा केला. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात मराठीचा वापर प्रभावीपणे व्हावा, यासाठी देखील कायदा केला. पण तरीही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज आहे असे मत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केले.

मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई होते. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि संवर्धनाबाबत यावेळी  चर्चा करण्यात आली. राज्य मराठी विकास संस्थेच्या सदस्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज सर्व सदस्यांची बैठक पार पडली. मराठी भाषा विभागाने मागील दोन वर्षांत अनेक चांगले उपक्रम राबविले. मराठी भाषेचे संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. दैनंदिन कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. याशिवाय दुकानांच्या पाटय़ांचे निरिक्षण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी सध्या राबवत असलेल्या व आगामी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी अच्युत गोडबोले, सुदेश भोसले, प्रशांत गिरबने, हेरंब कुलकर्णी, सिसिलिया कार्व्हालो, नमिता कीर, डॉ. गुरुनाथ पंडीत, रावसाहेब काळे यांनी सूचना केल्या. आगामी काळात बाल विश्वकोशची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, अपर सचिव भूषण गगराणी, साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.

संवर्धन करणाऱयांना जोडून घ्यावे

मराठीचे संवर्धन करणाऱयांना आपण जोडून घेतले पाहिजे. मुंबई आणि तंजावर या शहरातील सांस्कृतिक आणि भाषिक देवाण-घेवाण झाली पाहीजे. मराठी भाषा विभागाचे उपक्रम जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात करावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱयांना याद्वारे सर्व माहिती उपलब्ध होईल, असेही देसाई म्हणाले.