
सरकारी वाहन, पोलीस व सोबतच्या मतदान कर्मचार्यांसह सोशल मीडियावर फोटो टाकणे एका सनदी अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. यूपी-केडरचे आयएएस अधिकारी अभिषेक सिंग यांची गुजरात निवडणुकीसाठी आसरवा आणि बापूनगर विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या अधिकाऱ्याने त्याचे ड्युटीवर असतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले यामुळे त्याला निवडणूक कर्तव्यातून काढून टाकण्यात आले आहे.
गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांना शुक्रवारी लिहिलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, गुजरात निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याची पोस्ट अभिषेक सिंग यांनी इंस्टाग्रामवर टाकली. हा एक “पब्लिसिटी स्टंट” असून अभिषेक यांनी त्यांच्या अधिकृत पदाचा गैरवापर केला. या आयएएस अधिकाऱ्याने त्याच्या ट्विटर हँडलवर देखील “गुजरात निवडणुकीसाठी अहमदाबादमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्त झाली” अशा मथळ्यासह छायाचित्रे अपलोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्याने मुख्य निवडणूक अधिकार्यांसोबत असतानाचे फोटो देखील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आहेत. राज्य निवडणूक पॅनेलने या प्रकरणाची दाखल घेत हे अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच सिंग यांना दोन मतदारसंघांसाठी सामान्य निरीक्षक म्हणून त्यांच्या कर्तव्यापासून मुक्त केले. या अधिकार्याला आता पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक संबंधित इतर कोणत्याही कर्तव्यावर रुजू होण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या अधिकाऱ्याला नोडल अधिकाऱ्यांकडे अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याबद्दल गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती म्हणाल्या की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, असरवा आणि बापूनगरमधील सामान्य निरीक्षकाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या कोणाकडे सोपवण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाने या मतदारसंघांसाठी नवीन निरीक्षक नियुक्त करणे अपेक्षित आहे.
























































