पुणे – शहरातील वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार, एक जखमी

455
accident

शहरातील विविध भागात झालेल्या अपघातामध्ये चारजण ठार झाले असून एक महिला जखमी झाली आहे. हे अपघात गणेशखिंड रस्ता, वानवडी, शेवाळवाडी आणि खराडी परिसरात घडले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशखिंड रस्त्यावरुन भरधाव वेगात चाललेला दुचाकीस्वार घसरुन खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात 22 जूनला रात्री सव्वा नउच्या सुमारास घडला होता. राहूल सतीश सावंत (वय 24 रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार एस. टी. निकम यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत क्रेनचालकाने दिलेल्या धडकेत तीन वर्षीय चिमुरडा ठार झाला असून त्याची आई जखमी झाली आहे. हा अपघात दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वानवडीतील संविधान चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. याप्रकरणी क्रेनचालकाला वानवडी पोलिसांनी अटक केले आहे. सुभाष भारत खाडे (वय 3, रा. काकडे मैदान, वानवडी ) असे ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. अपघातात रेखा भारत खाडे जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी क्रेनचालक अर्जुन रामदुलारी विश्वकर्मा (वय 20, रा. उंड्री, कोंढवा, मूळ-लखनऊ ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

भाजी खरेदी करुन पायी घरी जात असताना अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या धडकेत तरुण ठार झाला. ही घटना 28 जूनला रात्री नउ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी भाजीमार्केट समोरील रस्त्यावर घडली. दादा तुकाराम जगताप (वय 38, रा. शेवाळवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पोपट माने यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौथ्या घटनेत भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत तरुण ठार झाला. हा अपघात 25 जूनला रात्री दहाच्या सुमारास खराडीतील प्राईड आयकॉन इमारतीजवळील रस्त्यावर घडला. तिमन्ना बाबू कर्णिक (वय 26, रा. थिटे वस्ती, खराडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या