
मला ओळखले नाही का, मी इथला भाई आहे, असे म्हणत टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याशिवाय परिसरातील सहा वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना 29 मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवतेजनगर गल्ली क्रमांक एकमध्ये घडली.
विकास भगवान गायकवाड (वय 22 रा. हडपसर) आणि लक्ष्मण गणेश शिंदे (वय 20 रा. बिबवेवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अरूण हनुमंत पोळ (रा. बिबवेवाडी ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची बहीण शारदा चव्हाण (41) यांनी फिर्याद दिली आहे.
अरूण हे शिवतेजनगर परिसरात राहायला आहेत. रविवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास टोळके त्याठिकाणी आले. त्यापैकी एकाने अरूणला मला ओळखत नाही का, मी इथला भाई आहे, असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने वार केला. इतर साथीदारांनी अरूणला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी परिसरातील सहा वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे यांनी दिली.

























































