
पुणे शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या एका नामांकित फूटवेअर शोरूमच्या मालकाचा दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. अपहरणकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील पाडेगाव कॅनॉलजकळ नेऊन त्याचा पिस्तुलातून डोक्यात गोळय़ा घालून खून केला. चंदन कृपादास शेवानी (48) असे खून झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद कृपालदास शेवानी (57) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदन शेवानी यांचे लक्ष्मी रस्त्यावर फूटवेअर शोरूम आहे. शेवानी शनिवारी दिवसभर घरी होते. रात्री साडेआठच्या सुमारास शेवानी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनीही त्यांच्या मोबाईलकर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवानी यांचा फोन बंद होता. शेवानी यांचे अपहरण करण्यात आल्याच्या शक्यतेने बंडगार्डन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता.


























































