
पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट साडेतीन टक्क्यांच्या आत आल्याने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता देताना दुकाने आणि हॉटेल्सला मोठा दिलासा दिला. आज घेतलेल्या निर्णयानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आठवडय़ातील सहा दिवस सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. उद्या, सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. जिह्याच्या ग्रामीण क्षेत्रात सध्या लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शहर आणि जिह्यातील सर्व खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी निर्बंध शिथिल केल्याच्या निर्णयाची घोषणा केली.
गणेशोत्सवाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
लवकरच गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. याबद्दल त्यांनी सोलापूर जिह्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ज्या ठिकाणी गॅदरिंग झाले त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट वाढतो. सोलापूर जिह्यात पंढरपूर, माळशिरसमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. तिथे पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्या पुढे आहे, परंतु जिह्यातल्या ज्या तालुक्यांमध्ये गर्दी नव्हती तेथे मात्र पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे उत्सवाला आवर घालण्याची गरज वाटते.
पुण्यात सवलतीचे नवे नियम
सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार.
हॉटेल सर्व दिवस रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार. रात्री 11 पर्यंत पार्सल सुविधा.
मॉल सर्व दिवस रात्री 8 पर्यंत सुरू ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश.
उद्याने नियमित वेळेनुसार सुरू होणार.
जलतरण व निकट संपर्क येणारे खेळ वगळून इतर खेळ सुरू.
ग्रामीण क्षेत्रासाठी लेव्हल तीनचे नियम लावून दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने, हॉटेल्स सुरू राहणार.
































































