कोरोना संसर्गाच्या ऑफरला भुलला, अन सव्वा लाखांना डुबला

अतिहव्यासामुळे नागरिकांना पश्चाताप करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही दोन चार हजारांच्या आमिषाला भुलून नागरिकांकडून सायबर चोरट्यांना बँकेचे पासवर्ड शेअर केले असल्यामुळे फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना आंबेगाव बुद्रूक परिसरात घडली आहे. ‘फोन पे’ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत कोरोना संसर्ग ऑफरच्या नावाखाली सायबर चोरट्याने तरुणाला 1 लाख 36 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे.

कोरोना संसर्गामुळे तुम्हाला कंपनीकडून दोन हजार रुपये रोख पाठविण्यात येणार असल्याचे सांगत सायबर चोरट्याने तरुणाकडून ओटीपी मिळवित गंडा घातला आहे. याप्रकरणी गिरीष (वय 48, रा. फालेनगर, आंबेगाव बुद्रूक) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरीष एका खासगी कंपनीत कामाला असून आंबेगाव बुद्रुक परिसरात राहायला आहेत. 20 जूनला त्यांना एकाने फोन करुन फोन पे कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे आमच्या कंपनीकडून तुम्हाला 2 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी सांगण्यास सांगितले. त्यामुळे गिरीष यांनी संबंधित फोनकत्र्यावर विश्वास ठेउन 2 हजार रुपये मिळविण्यासाठी ओटीपी शेअर केला. त्यानंतर काही वेळातच सायबर चोरट्याने गिरीष यांच्या बँकखात्यातून ऑनलाईनरित्या 1 लाख 36 हजार रुपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन फसवणूक केली.

”कोरोना संक्रमनाच्या नावाखाली सायबर चोरट्याने एकाला फोन करुन दोन हजारांचे आमिष दाखविले. त्यामुळे संबंधिताने आमिषाला भुलून बँकेचा ओटीपी सायबर चोरट्याला दिला. त्यामुळे चोरट्याने त्यांना 1 लाख 36 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सावगिरी बाळगली पाहिजे.” – विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ

आपली प्रतिक्रिया द्या