
मोटार अडविल्यामुळे पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील पाच जणांस अटक करण्यात आली आहे. पाषाणमधील लमाणतांडा परिसरात ही घटना घडली होती.
शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय २५, रा. नाना पेठ), साईराज सुनिल काकडे (वय २३, रा. मंगळवार पेठ), राहूल सुरेश खेत्रे (वय ४०, रा. नाना पेठ), समीर विनोद तांबे (वय ३१, रा. नरपतगिरी चौक), शार्दुल प्रमोद ढाके (वय २८, रा. बावधन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शिवम व राहूल यांना तडीपार करण्यात आले होते. तडीपारी संपवून ते आल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.
चतुःश्रुंगी पोलिस गुरूवारी रात्री गस्त घालत होते. पाषाण परिसरातील लमांडतांडा येथे गस्त घालताना पोलिसांना एक संशयास्पद मोटार फिरताना दिसली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्या पथकाने त्यांना अडविले. पोलिसांनी मोटार अडविल्याचा आरोपींना राग आल्यामुळे आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यावेळी आरोपींनी मद्यपान केले होते. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत पाच जणांस अटक केली आहे.


























































