
शहरातील हांडेवाडी येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये कार्ड क्लोनिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याठिकाणी पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या एटीएम कार्डची माहिती छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने चोरली जात होती. याप्रकरणी सायबर पोलिसस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र मल्लिकार्जुन जाधव (रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अफ्रिकन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी रस्त्यावर सातवनगर येथे आयसीआयसी आय बँकेचे एटीएम सेंटर आहे. त्याठिकाणी जाणाऱ्या नागरिकांच्या एटीएम कार्डची माहिती चोरण्यासाठी आरोपीने कार्ड क्लोनिंगचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसविले होते. नागरिकांनी टाकलेले पासवर्ड दिसावे म्हणून पीनहोल कॅमेरा बसविला असल्याचे आढळून आले आहे. आरोपीने या ठिकाणी पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या एटीएम कार्डचा डेटा चोरून त्याच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. एका व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी हा प्रकार आढळून आल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी या ठिकाणाहून पैसे काढले आहेत. त्यांनी तत्काळ आपले पीन क्रमांक बदलून घ्याव्येत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
































































