पुण्यात मंदीरातील दानपेट्या फोडणाऱ्या गुन्हेगारांना अटक, फरासखाना पोलिस विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

शहरातील जैन मंदीर, गणपती मंदीर, शितळादेवी आणि म्हसोबा मंदीरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 94 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रमीज इकबाल हकीम खान (वय 20 रा. भवानी पेठ), अनिल पटेल (वय 28, रा. बुधवार पेठ), विनायक बंडू कराडे (वय 22 रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लॉकडाउन सुरू असतानाही शहरातील विविध मंदीरातील दानपेट्या फोडून चोरी केल्याच्या घटनांमुळे भाविकांंमध्ये संताप व्यक्त केला होता. त्यापाश्र्वभूमीवर फरासखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी तपास पथकाची स्थापना केली होती. त्यानुसार गुरूवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन मंदीरातून 1 लाख 93 हजारांचा ऐवज चोरणाऱ्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रमीज खानला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख 85 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंदीरातून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अनिल पटेलला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याशिवाय समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शितळादेवी मंदीरातील दोन चांदीचे मुकूट चोरीला गेले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने विनायक कराळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 8 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.