
वाहनचालकांना धमकावून लुटमार करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने नगर रस्त्यावर पकडले. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे, छड्ढयाची बंदुक, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दत्ता रंगनाथ गायकवाड (वय 23), गौरव अर्जुन परजणे (वय 20), किशोर विश्वनाथ जाधव (वय 22, तिघे रा. दुबेनगर, वाघोली), दत्ता बबन व्यवहारे (वय 37, रा. लोहगाव चौक, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरातील नगर रस्ता परिसरातील लोणीकंद भागात वाहनचालकांना अडवून लुटमारीचे गुन्हे घडले होते. चोरट्यांची टोळी लोणीकंद-बकोरी रस्त्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस शिपाई ऋषीकेश ताकवणे आणि ऋषीकेश व्यवहारे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून चौघांना पकडले. त्यांच्याकडून छऱ्याची बंदुक, कोयता, चाकु, मिरची पूड, मोबाइल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंन्द्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लाहिगुडे यांनी केली.






























































