
सिंहगड रस्ता परिसरातील किरकोळ विक्रेत्यांसह हातगाडीवर फिरून व्यवसाय करणार्यांना दमदाटी करून भाईगिरी करणार्याविरूद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार कारावाई केली आहे. त्याची एक वर्षांसाठी नागपूर कारागृहात रवानगी केली आहे. त्याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुल करणे, गंभीर जखमी करणे, हत्याराचा धाक दाखविणे, लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शिवराज शंकर शिंदे (वय 34 रा. नर्हे, मुळगाव-ऊफळाई रोड, गोंधील प्लॉट, बार्शी,सोलापुर) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे. 2017 सालापासुन तो गुन्हेगारी करीत होता.
सराईत शिवराज शिंदे हा सिंहगड रस्ता परिसरातील हातगाडीवाले तसेच फिरुन व्यवसाय करणार्यांना दमदाटी करून लुटमार करीत होता. हत्याराचा धाक दाखवणे, प्रतिकार करणार्यांवर हल्ला करीत त्याने जबर दहशत निर्माण केली होती. त्याच्याविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्यावतीने एसीपी सुनील पवार, उपायुक्त सुहैल शर्मा अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. त्यानुसार शिंदेविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहैल शर्मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, एपीआय सचिन निकम, मिनाक्षी महाडीक, स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांनी केली.
भाईगिरी करणारे 86 सराईत स्थानबद्ध
शहरातील विविध भागात भाईगिरी -दादागिरी करून दहशत निर्माण करणार्या सराईतांविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील दोन वर्षांत 86 जणांविरूद्ध कारवाई करीत विविध कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी प्रतिबंधक कारवाई कायम ठेवली जाणार आहे.































































