पुण्यात संशयातून रिक्षाचालकावर हल्ला, रिक्षाचेही नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडणामध्ये सहभागी असल्याच्या संशयातून तिघाजणांनी रिक्षाचालकावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्याशिवाय रिक्षाचीही तोडफोड केल्याची घटना 10 ऑगस्टला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हडपसरमधील गंगानगरमध्ये घडली.

पंकज वाघमारे, सागर ओव्हळ, मयूर ढोबळे (सर्व रा. गंगानगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. अभिषेक सुपेकर (वय – 21) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अभिषेक हे रिक्षाचालक असून 10 ऑगस्टला प्रवाशी घेउन चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी भांडणामध्ये सहभागी असल्याच्या संशयातून अभिषेकला जाब विचारला. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करून रिक्षाचेही नुकसान केले. अभिषेकला मदत करण्यासाठी आलेल्या नागरिकांना जीवे मारण्याची धमकी टोळक्याने दिली. पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.