
धायरीतील रायकर मळा भागात फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तरुणाने स्वतःच गळ्यावर कटरने वार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
महेश राजाराम तवंडे (वय 32, रायकर मळा, धायरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश हा खाजगी कंपनीत नोकरी करायचा. त्याच्या मैत्रिणीसोबत फ्लॅट भाड्याने घेऊन तो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. शुक्रवारी त्याची मैत्रीण बाहेरगावी गेलेली असताना फ्लॅटवर तो एकटाच होता. तो मानसिक तणावात होता. दिवसा तो कुणाशी तरी मोठ्याने फोनवर बोलत होता. संशय आल्याने रात्री घरमालकाने दरवाजा ठोठावला असता आतमधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.






























































