
कुविख्यात गुन्हेगार नीलेश बसवंत याने न्यायालयात खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बापू नायर टोळीतील कुविख्यात गुंड नीलेश बसवंत (रा. अपर इंदिरानगर) याला पोलिसांनी 2015 मध्ये अटक केली होती. त्यानंतर त्याने दुर्धर आजारावर उपचारासाठी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळविला होता. त्यानंतर नीलेश 16 एप्रिल 2020 पासून जामीनवर आहे. त्याने न्यायालयात सादर केलेली कागदपत्रांबाबत पोलिसांना संशय आला होता. त्यानुसार नीलेशने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. त्याशिवाय खासगी दवाखान्यात भेट देऊन त्याच्या आजाराबाबतची माहिती घेतली.
नीलेशने सातारा येथील शेंद्रेतील डॉ. दत्तात्रय अंदुरे यांचे खोटे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, राहूल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

































































