
मुंबईतील कामाठीपूरा येथून पुण्यात एम.डी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 21 लाख रुपयांचा तब्बल 106 ग्रॅम एम.डी पावडर जप्त करण्यात आली आहे.
आर्यन प्रविण चौरसीया (वय 25, रा. कामाठीपूरा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहर परिसरात गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी, कर्मचारी गस्तीवर होते. या दरम्यान एक संशयीत पुणे स्टेशन परिसरात एम. डी पावडर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून चौरसीया याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 21 लाख 20 हजार रुपये िंकमतीचा 106 ग्रॅम एम. डी हा अमली पदार्थ आढळून आला. अंमली पदार्थ, मोबाईल असा एकूण 21 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, अंमलदार योगेश मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमदंडी ,संदीप जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.





























































